दिल्ली हायकोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांच्या 'गुलाब गँग' सिनेमाच्या प्रदर्शनावर 8 मेपर्यंत देशभरात बंदी घातली होती. मात्र आता हायकोर्टाने या सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे 'गुलाब गँग'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून ठरलेल्याच दिवशी म्हणजे उद्या (7 मार्च) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
बुंदेलखंड (बांदा)च्या गुलाब गँगच्या कमांडर संपत पाल यांच्या जीवनपटावर हा सिनेमा बेतला असल्याचे म्हटले जात आहे. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी निर्माता आणि दिग्दर्शकांनी आपल्याशी चर्चा केली नसल्याचे संपत लाल यांचे म्हणणे आहे. संपत पाल यांनी बुधवारी सिनेमाचे प्रदर्शन रोकण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिनेमाची नायिका आपली भूमिका निभावतेय आणि सिनेमाच्या प्रोमोत आपल्याला चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. त्यामुळे आपल्या इमेजला धोका पोहोचतो, असे संपत पाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. याच्या भरपाईसाठी त्यांनी निर्मात्यांकडे आर्थिक नुकसान भरपाईचीदेखील मागणी केली होती.
मात्र यापूर्वी न्यायाधिशांनी याचिका दाखल करण्यासाठी एवढा वेळ का लावला? असा सवाल संपत पाल यांना केला होता. आता ठरलेल्याच दिवशी म्हणजेच उद्या हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.