आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Dixit Write Letter To MLA Vinay Kore For Releasing Sunder Elephant

सुंदर हत्तीच्या सुटकेसाठी माधुरी दीक्षितचे आमदार विनय कोरेंना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - वारणानगर येथील सुंदर हत्तीच्या सुटकेसाठी आता प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी माजी मंत्री, आमदार विनय कोरे यांना पत्र पाठवून विनंती केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवण्याची विनंती नेने दांपत्याने पत्राद्वारे केली आहे.
वारणा सहकार उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांनी 2007 मध्ये सुंदर नावाचा हत्ती जोतिबा देवस्थानाला भेट दिला आहे. काही वर्षे जोतिबा डोंगरावर हा हत्ती वास्तव्याला होता; परंतु काही वेळा सुंदरने चिडलेल्या अवस्थेत दंगा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला वारणानगर येथे हलवण्यात आले.
सद्य:स्थितीत सुंदर याचे वारणानगर येथील शेडमध्ये हाल होत असून त्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करून ‘पेटा’ या प्राण्यांच्या हक्कासाठी लढणा-या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने सुंदर हत्तीला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्राकडे पाठवण्याचा आदेश महाराष्‍ट्र शासनाच्या वनखात्याला दिला होता. मात्र, सुंदर हत्तीचे कोणत्याही प्रकारचे हाल येथे होत नसून तो जोतिबा देवस्थानकडेच राहावा अशीही मागणी भाविकांतून होत आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्‍ट्र देवस्थान समितीने सुंदरची देखभाल करणे शक्य नसल्याचे कारण सांगून हा हत्ती पुन्हा विनय कोरे यांच्या वारणा समूहाला परत दिला आहे. आता याप्रकरणी 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, ‘पेटा’ या संस्थेशी निगडित असणा-या माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. राम नेने यांनी थेट विनय कोरे यांनाच पत्र पाठवून सुंदरच्या सुटकेसाठी विनंती केली आहे. आपल्या प्रभावाचा वापर करून सुंदरची सुटका करा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या पत्राला कोरे काय उत्तर देतात, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.