आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Melbourne Festival To Celebrate 100 Years Of Indian Cinema

भारतीय चित्रपटाचा ऑस्ट्रेलियात डंका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असतानाच यंदा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे दुसरा भारतीय चित्रपट महोत्सव 3 ते 15 मे या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात भारतीय चित्रपटाची शताब्दी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे लघुउद्योगमंत्री लुईस आशर यांनी नुकतीच मुंबईत दिली.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या महोत्सवाची ब्रँड अँम्बेसेडर विद्या बालन आहे. विद्याचेही भारताप्रमाणेच मेलबर्नवर विशेष प्रेम असल्याने तिची निवड करण्यात आल्याचे आशर यांनी सांगितले. गेल्या 100 वर्षांत निर्माण करण्यात आलेले, तसेच काही गाजलेले चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर आशियाई उपखंडातील काही गाजलेल्या चित्रपटांचा आनंदही यानिमित्ताने ऑस्ट्रेलियातील चित्रपटप्रेमींना लुटता येणार आहे. महोत्सवाचा समारोप ‘दि रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाने होणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व अभिनेते महोत्सवात सहभागी होणार आहेत. अनेक मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी हा महोत्सव उपलब्ध करून देणार आहे, हे या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना त्यातून भारतीय चित्रपटसृष्टी समजून घेता येईल, असा विश्वास आशर यांनी व्यक्त केला.

यश चोप्रा यांना मरणोत्तर पुरस्कार
महोत्सवात भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत भरीव योगदान दिल्याबद्दल निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पामेला चोप्रा हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. फिल्म व्हिक्टोरियाच्या माध्यमातून करमणूक क्षेत्रात भारताबरोबर सहनिर्मिती करण्यात येणार आहे. त्याद्वारे चित्रपट व मालिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने भारत व मेलबर्न यांच्यातील व्यावसायिक व सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वासही आशर यांनी व्यक्त केला आहे.