आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'इसक\' - कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमकथेवर आधारित सिनेमे बनवण्यास बॉलिवूडने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आजवर अगणिक रोमँटिक सिनेमे येथे तयार झाले आहेत. आता प्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांच्या गाजलेल्या 'रोमियो अँड ज्युलिएट' या नाटकावर आधारित 'इसक' हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीला आला आहे.

हा सिनेमा मनीष तिवारीने दिग्दर्शित केला आहे. बनारसच्या पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमात वाळू माफिया आणि नक्षलवाद्यांद्वारे केली जाणारी हिंसा दाखवण्यात आली आहे. कश्यप आणि मिश्रा हे बनारसचे दोन कुटुंब वाळू माफियाचे प्रमुख आहेत.

या दोन कुटुंबात असलेले शत्रुत्व या सिनेमात बघायला मिळतं. कश्यप यांची एक अठरा वर्षांची मुलगी असून तिचे नाव बच्ची आहे. तर दुसरीकडे मिश्रा यांचा एक मुलगा असून त्याचे नाव राहुल आहे.

बच्ची आणि राहुलचा आमनासामना होतो आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. शत्रुत्व असलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणीचे प्रेम याआधी आपण अनेक सिनेमांमध्ये बघितले आहे.

या सिनेमाची कथासुद्धा याचप्रकारे पुढे सरकते. बच्ची आणि राहुल सर्व वाद-विवादांपासून दूर राहून प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना कळल्यानंतर काय होईल, याची भीती दोघांनाही वाटत नाही.

जेव्हा या दोघांच्या प्रेमाबद्दल कश्यप आणि मिश्रा कुटुंबीयांना समजतं, तेव्हा त्यांच्यातील भांडणाला युद्धाचे रुप प्राप्त होतं. त्यानंतर अनेक चढ-उतार या सिनेमात बघायला मिळतात.

अभिनय - रोमियो, ज्युलिएट यांच्या प्रेमकथेवर आणि बनारसच्या पार्श्वभूमीवर आधारित या सिनेमात प्रतीक बब्बरबरोबर अमाइरा दस्तूर, रवि किशन, राजेश्वरी सचदेव, मकरंद देशपांडे, नीना गुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
बनारसच्या मुलाच्या भूमिकेत प्रतीकने उत्तम काम केले आहे. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेल्या अमाइरा दस्तुरचा हा पहिला सिनेमा आहे. अमाइरा अभिनयासाठी अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. तिचे सौंदर्य आणि हास्य मनमोहून घेणारे आहे.

दिग्दर्शन - सिनेमाचे लोकेशन बनारस आहे. 'रांझना' या सिनेमातदेखील तुम्ही बनारस बघितले आहे. मनीष तिवारीने मोठ्या खुबीने शेक्सपिअरच्या नाटकाला देसी अंदाजात सादर केले आहे, दोन कुटुंबातील द्वंद त्यांनी उत्कृष्टरित्या चित्रीत केला आहे.

का बघावा - सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि देसी अंदाजातील सिनेमा आवडत असल्यास या सिनेमाचा ऑप्शन तुमच्याकडे या विकेण्ड आहे. आमच्याकडून या सिनेमाला 3 स्टार.