आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जंजीर’ची शाबासकी 20 वर्षांनंतर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रख्यात अभिनेते प्राण यांचे इंग्रजी चरित्र बनी रुबेन यांनी ‘...अँड प्राण’ या नावाने लिहिले. (प्रकाशक - हार्परकॉलिन्स पब्लिशर्स इंडिया; प्रथम आवृत्तीचे प्रकाशन वर्ष - 2005). या चरित्रग्रंथाचा मराठीत ‘...आणि प्राण’ या नावाने प्रसिद्ध झाला. (प्रकाशक -चिनार पब्लिशर्स; प्रथम आवृत्तीचे प्रकाशन वर्ष - मार्च 2007) या चरित्रग्रंथामध्ये प्राण यांच्याविषयी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी लिहिलेला लेखही समाविष्ट केलेला आहे. त्या लेखातील हा संपादित अंश.


काही अभिनेते हे केवळ आदर वाटण्याजोगे नसतात, तर त्याही पलीकडे त्यांच्याबद्दल आपल्याला काही तरी वाटत असते. प्राणसाहेब त्यांपैकी एक. रसिकांच्या अनेक पिढ्यांवर त्यांचा प्रभाव आहे. सुमारे अर्धशतक आपल्या प्रेक्षकांशी खूप गूढ, जादुई संवाद या कलाकारांनी साधला आहे. प्राण म्हणजे जीवन. आपल्या अप्रतिम कौशल्याने प्राण यांनी सिनेमाला जीवन दिले आहे. प्रेक्षकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांनी थरथराट निर्माण केला आणि अखेर दुर्जनाचा विजय होत नसतो हा संदेश दिला. प्राण यांना आपल्या मुलाने भेटू नये, असे पालकांना वाटायचे. तितक्याच कौशल्याने आणि प्रतिभेने ते चरित्र कलाकाराच्या भूमिका साकार करू लागले. त्यातून त्यांचे अष्टपैलुत्वच दिसते.


1960 सालची गोष्ट. मुंबईला मी काही दिवसांसाठी आलो होतो. आर. के. स्टुडिओमध्ये प्राणसाहेब पत्र्यांच्या शेडजवळील खुर्चीवर बसून होते. ते अत्यंत नम्र आणि सौजन्याने वागत होते. आमच्याबरोबर त्यांनी फोटो काढू दिला. मी त्यांची स्वाक्षरीही घेतली. घरी आल्यावर मला प्रश्न पडला की, खलनायकाची भूमिका करणारी व्यक्ती इतकी चांगली आणि आतिथ्यशील असू शकते?


मी मुंबईला आलो तेव्हा प्राण यांचे चिरंजीव सुनील याला कायम भेटत असे. तो अजिताभचा घनिष्ठ मित्र होता. प्राण यांच्याशी माझा पहिला संबंध आला तो ‘जंजीर’च्या सेटवर. तोवर प्राण यांनी खलनायकाच्या भूमिका सोडून चरित्र भूमिका करणे सुरू केले होते. ‘उपकार’ चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. ‘जंजीर’च्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी पोलिस ठाण्याचे दृश्य होते. संतापून मी शेरखानला शिव्या घालतो, असा प्रसंग होता. मी काहीसा चाचरतच होतो; पण जेव्हा प्राण यांना पाहिले तेव्हा मला धीर आला. कारण ‘जंजीर’मध्ये प्राण यांच्यामुळेच मला भूमिका मिळाली होती. ‘परवाना’ चित्रपटातील माझे काम पाहून ओमप्रकाश यांनी ‘जंजीर’च्या निर्मात्यांकडे माझी शिफारस केली होती, तर ‘जंजीर’साठी कलाकारांची नावे ठरवली जात असताना प्राण यांनी माझ्या नावाला पाठिंबा दिला होता. प्राण स्वत:चे चित्रपट पाहत नसत, ही जरा आश्चर्याचीच बाब आहे. ‘जंजीर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सुमारे वीस वर्षांनी योगायोगाने त्यांनी तो पाहिला. त्यांनी मला फोन केला आणि ‘मला तुझे काम आवडले’ असे सांगितले. वीस वर्षांनंतर का असेना; पण मला त्यांच्या या शाबासकीचे अप्रूप वाटले.