आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pran Is A Real Hero Who Used To Take More Money Than Hero

हीरोपेक्षाही जास्त मानधन स्वीकारणारे खल‘नायक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकेकाळचे प्रसिद्ध खलनायक आणि चरित्र अभिनेता प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने फिल्मी इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय सिनेसृष्टीला यंदा 3 मे रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

प्राण यांचे पुत्र सुनील सिकंद यांनी प्राण यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अर्थात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्राण यांना हा पुरस्कार मिळण्यास उशीर झाल्याची तसेच हा पुरस्कार त्यांना याआधीच मिळायला हवा होता, अशी भावना व्यक्त केली. प्राण यांनी 60 वर्षांच्या कारकीर्दीत 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. पैकी अनेक सिनेमे त्यांच्याच नावावर चालले. त्यांनी अनेक चित्रपटांत रंगवलेला खलनायक प्रचंड लोकप्रिय ठरला. काही अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेणारे खलनायक म्हणून प्राण यांचा नावलौकिक होता. करिअरची सुरुवात छायाचित्रकार म्हणून केली.

प्राण 1948 मध्ये फाळणीच्या वेळी लाहोर येथून भारतात आले. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1920 रोजी दिल्लीत लाला केवलकृष्ण सिकंद यांच्या घरी झाला. त्यांचे वडील शासकीय ठेकेदार होते. प्राण यांचे शिक्षण पंजाबमध्ये कपूरथळा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मेरठ, डेहराडून व रामपूर येथे झाले. सुरुवातीला काही चित्रपट अयशस्वी ठरल्यावर देव आनंदसोबत ‘जिद्दी’ मध्ये काम केले. 1969 ते 82 चा काळ प्राण यांच्यासाठी प्रचंड यशस्वी ठरला. मधुमती, जिस देश में गंगा बहती है, राम और शाम, देवदास अशा अनेक चित्रपटांत त्यांनी खलनायक रंगवला. हीरोपेक्षा जास्त मानधन त्यांना मिळायचे. प्राण यांना क्रीडा क्षेत्रातही रस होता. 50 च्या दशकात त्यांनी फुटबॉल टीमही बनवली होती.


2001 मध्ये पद्मभूषण
1968 मध्ये उपकार, 1970 मध्ये आंसू बन गये फूल व 1973 मध्ये बेईमानसाठी प्राण यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1997 मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव तर 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला आहे.