आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. गिरीश ओक यांना राम गोपाल वर्माचा माफीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची परवानगी न घेता त्यांचा आवाज "सत्या-2' सिनेमाच्या प्रोमोमध्ये वापरणा-या दिग्दर्शक राम गोपाल वर्माने त्यांची माफी मागितली आहे. रामगोपाल वर्मा यांनी डॉ. गिरीश ओक यांची माफी न मागितल्यास त्यांना चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात बंदी घालण्याचा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेने दिला होता. शिवसेनेच्या चित्रपट सेनेने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे राम गोपाल वर्मा यांनी शरणागती पत्कारत डॉ. ओक यांना माफीपत्र पाठवले.

'सत्या 2' या सिनेमाच्या ऑडिशनदरम्यान डॉ. गिरीश ओक यांनी काही संवाद वाचले होते. रामगोपाल वर्मा यांनी डॉ. ओक यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता आणि त्यांची परवानगी न घेता ते संवाद जशाच्या तसे सिनेमाच्या पहिल्या प्रोमोमध्ये वापरले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. ओक यांना धक्का बसला होता. विश्वासात न घेता रामूने असं केल्यामुळे डॉ. ओक यांनी सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनकडे फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडे दाद मागितली.

शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या दणक्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी रितसर माफी मागितली आहे. रामू यांनी आपल्या माफीनाम्यात म्हटले की, ''मी 'सत्या 2' या सिनेमाच्या पहिल्या प्रोमोमध्ये तुमच्या आवाजातील संवाद परवानगी न घेता वापरले आहेत. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. भविष्यात यापुढे अशाप्रकारची चुक होणार नाही, अशी ग्वाही मी देतो.''

अखेर न्याय मिळाल्यामुळे डॉ. गिरीश ओक यांनी समाधान व्यक्त केले आहे.