मुंबई- रिचा चढ्ढा बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आहे. रिचाचा जन्म 28 डिसेंबर 1988 रोजी पंजाबमधील अमृतसर या शहरात झाला. परंतु, त्यानंतर ती दिल्लीला आली. रिचाने फिल्मी करिअरची सुरवात 2008 या वर्षी आलेल्या ‘ओए लक्की, लक्की ओए’ या कॉमेडी ड्रामा चित्रपटाने केली. दिबाकर बॅनर्जी यांच्या या चित्रपटात रिचाव्यतिरिक्त अभय देओल, परेश रावल, नीतू चंद्रा आणि अर्चना पूरनसिंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. या चित्रपटात रिचा डॉलीच्या भूमिकेत दिसून आली.
रिचाने करिअरची सुरवात मॉडेलिंगने केली. त्यानंतर तिने थिएटरला प्राथमिकता दिली. तिने भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही अनेक नाटकांमध्ये भूमिका केला.
बॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘ओए लक्की, लक्की ओए’मधील भूमिकेबद्दल रिचाची खुप प्रशंसा करण्यात आली. या चित्रपटानंतर रिचा ‘बेनी अॅण्ड बबलू’ यात दिसली. परंतु, तिचा हा चित्रपट काही खास चालला नाही.
2012 मध्ये आलेल्या ‘गॅग्ज ऑफ वासेपूर’मध्ये रिचाने कसदार अभिनय केला. या चित्रपटात नगमा खातून ही भूमिका वठविणाऱ्या रिचाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर ती ‘गॅग्ज ऑफ वासेपूर-२’ या चित्रपटात दिसली. यातही तिने प्रभावी भूमिका सादर केली.
रिचाने गेल्या वर्षी तीन चित्रपटांत काम केले. हे तीन चित्रपट ‘फुकरे’, ‘शॉर्ट्स’ आणि ‘राम-लीला’ हे आहेत. यातील ‘फुकरे’ आणि ‘राम-लीला’ या चित्रपटांमधील रिचाच्या अभिनयाला प्रेक्षकांची वाहवाह मिळाली. ‘राम-लीला’या चित्रपाटातील तिची रसिला ही भूमिका सर्वांना भावली.
रिचाजवळ यंदाही अनेक चित्रपट आहेत. यातील ‘घूमकेतू’ आणि 'तमंचे' हे प्रमुख चित्रपट असल्याचे दिसून येते.