आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपेरी पडद्यावर प्रथमच ‘खरीखुरी’ नायिका, बीपी’नंतर रितेश-उत्तुंगचा सत्य घटनेवर आधारित ‘यलो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गतिमंद म्हणून हेटाळणारी करणार्‍या समाजाकडे दुर्लक्ष करत एका मुलीने पोहण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी तिने जिद्दीने प्रयत्नही चालवले आणि त्यात तिने प्रावीण्यही मिळवले. राष्ट्रीय स्तरावरही तिने चमकदार कामगिरी केली. आपल्या यशाचा झेंडा फडकावणार्‍या या मुलीचे नाव गौरी गाडगीळ. गौरीच्या धडपडीला सलाम करण्यासाठी तिच्यावर चित्रपट करण्याची कल्पना पुढे आली आणि ‘यलो’ चित्रपटातून ती आकारालाही आली. विशेष म्हणजे कथानकातील मुख्य नायिका स्वत: गौरीने साकारली आहे.
बालक-पालकच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता-निर्माता रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर आता पोहण्याची आवड असलेल्या एका विशेष मुलीची सत्यकथा रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. ज्या मुलीच्या आयुष्यावर ही कथा आधारित आहे त्या मुलीने- गौरी गाडगीळने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन म्हणून नाव कमावलेला महेश लिमये प्रथमच दिग्दर्शकाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे.
उत्तरायण, नटरंग, बालगंधर्व, बीपी, फॅशन, कॉर्पोरेट, हीरोइन, ट्रॅफिक सिग्नल, दबंग, दबंग-2 सिनेमांसाठी काम करणारा सिनेमेटोग्राफर महेशने ‘यलो’बद्दल ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
गौरीची ही गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याची योजना हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी आखली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही चित्रपटाची निर्मिती सुरू केली.
सिनेमातील काही खास दृश्यांचे चित्रीकरण बँकॉकला जाऊन करण्यात आली आहेत. हा चित्रपट तिकीट खिडकीवर बीपीप्रमाणे यश मिळवेल का, असे विचारता उत्तुंग म्हणाला, चांगला चित्रपट असेल, तर तो नक्कीच यश मिळवतो हे बीपी आणि अन्य चित्रपटांनी दाखवून दिले आहे.
माशावरून चित्रपटाचे नाव
‘यलो’ नावाबद्दल माहिती देताना महेशने सांगितले, यलो नावाचा एक मासा आहे. त्या माशाशी गौरीची तुलना करावयाची असल्याने आम्ही चित्रपटाचे नाव यलो ठेवले आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहताना यलो नाव किती सार्थक आहे, ते दिसून येईल. मराठीमध्ये अशा संवेदनशील विषयावरील सिनेमाबरोबर माझे नाव जोडले गेल्याने मला खूप आनंद झाला आहे, असेही महेश म्हणाला.
सिनेमात गौरीच्या आई-बाबांची भूमिका मृणाल कुलकर्णी आणि मनोज जोशी साकारत असून गौरीच्या स्विमिंग शिक्षकाच्या भूमिकेत उपेंद्र लिमये आहे. चार एप्रिल रोजी यलो चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.