आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलनायकीचे 'प्राण'तत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक झळाळता तारा अस्तंगत झाला आहे. आपल्या खलनायकीची अस्सल नाममुद्रा उमटवून हा कलावंत जरी निजधामास गेला असला तरी त्याने पडद्यावर साकार केलेल्या असंख्य भूमिका आपण कधीही विसरू शकत नाही. दिलीप कुमार, राज कपूर, राजेंद्र कुमार आदी अनेक बड्या नायकांसमोर हा माणूस खलनायक म्हणून समर्थपणे उभा राहिला. मला वाटते, त्याने खलनायक म्हणून साकार केलेल्या भूमिकांची संख्याच साडेतीनशेपेक्षा अधिक असावी.


प्राण चित्रपटात आला तो ‘यमला जट’ या चित्रपटापासून. मी चुकत नसेन तर त्या चित्रपटात नूरजहाँ नायिका होती. पडद्यावर खल भूमिका अतिशय ताकदीने करणारा प्राण प्रत्यक्ष जीवनात मात्र कमालीचा सज्जन होता. मैत्रीला जागणारा सच्चा मित्र होता. नर्गिसचा भाऊ अन्वर हुसेन हाही चित्रपटात खल भूमिका करायचा. अन्वर हुसेन इस्पितळात आजारी असताना प्राण त्याला भेटायला गेला, त्याच्याशी गप्पा मारल्या. अन्वर हुसेनला झोप लागल्यानंतर त्याच्या उशाखाली दहा हजार रुपये ठेवून प्राण शांतपणे निघून गेला. या कचकड्याच्या दुनियेत अशी माणसे फार दुर्मिळ असतात. प्राण त्यांपैकीच एक होता. या मायानगरीत उगवत्याला सलाम करणारे असंख्य असतात; पण मावळतीकडे झुकलेल्यांना असा प्रेमाचा हात देणारे फार थोडे असतात. ही एकच घटना माणूस म्हणून प्राण किती थोर होता, हे अधोरेखित करणारी आहे.
रसिकांना प्रश्न पडेल की, नव्वदी पार केलेल्या प्राणसाहेबांचा उल्लेख हा माणूस एकेरी पद्धतीने कसा करतो? उत्तर सोपे आहे. ज्याच्यावर आपले अपार पे्रम असते त्या व्यक्तीचा उल्लेख आपण एकेरीच करीत असतो. ‘बहार’मधला प्राण आठवतो तो सिगारेटची गोल वलये सोडणारा. ‘जिस देस मे गंगा बहती है’मधला त्याचा ‘राका’ व गळ्यावरून तर्जनी फिरविण्याची त्याची अदा कोण विसरेल? ‘राम और श्याम’मधला त्याचा खलनायकही असाच लक्षात राहणारा. ‘दिल ही तो है’मधला त्याचा अभिनय राज कपूर व नूतन असूनही लक्षात राहणाराच होता. किती भूमिकांची नावे द्यायची?


मात्र, मनोज कुमारच्या ‘उपकार’मधला त्याचा ‘मलंग चाचा’ आणि ‘कस्मे वादे प्यार वफा’ हे मन्नाडेचे गाणे पडद्यावर सर्वार्थाने जिवंत केले ते प्राणनेच. ‘शहीद भगतसिंग’ चित्रपटात त्याने उभा केलेला दरोडेखोर तर लाजवाबच! ‘बाबूजी आप हमे बहोत देर से मिले’ हा त्याचा संवाद काळजाचे पाणी करून गेला होता. आणि 1973 मधील ‘जंजीर’मधला त्याचा शेरखान आणि ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ हे गाणे दोन्हीही अप्रतिमच! अमिताभसमोर तो ज्या ताकदीने उभा राहिला त्याला तर तोडच नाही. त्यांची जुगलबंदी त्या चित्रपटात खूपच रंगली होती. शम्मी कपूरचा तो चित्रपट; नाव आठवत नाही, पण आजही प्राणने त्याला कायम वापरलेले पालुपद ‘शटाले शटाले’ अजूनही लक्षात आहे. ती नेपाळी टोपी, कोट अन् त्याचे ते पालुपद... क्या कहने? चरित्र भूमिकेला या कलावंताने एक भारदस्त महिरप प्रदान केली.


मैत्रीचा बंध जपावा तर प्राणनेच. मला वाटते, सत्तरच्या दशकात मुंबईला षण्मुखानंद सभागृहात एक मोठा जलसा झाला होता. त्यात लता मंगेशकर, आशा भोसले, राजकुमारी, शमशाद, तलत, रफी, मुकेश सारेच गायले. या जलशात सहभागी होण्यासाठी नूरजहाँही आली होती. विमानतळावर तिच्या स्वागतासाठी प्राण स्वत: गेला होता. नूरजहाँ प्राणला पाहताच अक्षरश: भारावून गेली. तिने त्याची गळाभेट घेतली. ही एकच घटना हा माणूस पडद्यापेक्षा पडद्याबाहेर किती निराळा होता, हे स्पष्ट करून जाते. आजकाल तर पडद्यावरचे नायकही प्रत्यक्ष जीवनात खलनायकाचा ‘रोल’ कसा निभावतात, हे आपण अलीकडेच ठोच्या पडद्यावर बातम्यांत पाहिलेच आहे.


प्राण याला अलीकडेच चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च असा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार बहाल करण्यात आला. मात्र, त्याला हा पुरस्कार किमान वीस वर्षे आधी मिळायला हवा होता, असे वाटते. सरकारची सारीच त-हा उफराटी. हा पुरस्कार देताना सरकारलाही आपण ‘खल भूमिका’ किती छान वठवू शकतो हेच तर प्राण यांना दाखवून द्यायचे नव्हते ना, अशी शंका येते. प्राण यांच्या निधनाने सुवर्णकाळातील एक लखलखते नक्षत्र काळाच्या पडद्याआड गेले. जोवर पडदा शाबूत राहील तोवर प्राण यांच्या चित्रपटांचा अन् भूमिकांचा विसर पडणे केवळ अशक्यच. अलविदा प्राणसाहेब!१ अरविंद गं. वैद्य