आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य, रंगतदार कार्यक्रमाने आयफाचा आज समारोप; बॉलिवूड अवतरलं मकाऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकाऊ - बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थिती आणि सहभागाने लक्षवेधी ठरलेल्या 14 व्या आयफा महोत्सवाचा समारोप शनिवारी होणार आहे. रंगारंग कार्यक्रमाबरोबरच पुरस्कार वितरणही पार पडणार आहे. त्यात अभिनेत्री श्रीदेवी व नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा यांच्यातील नृत्य जुगलबंदीबरोबरच माधुरी दीक्षित-दीपिका पादुकोनचा परफॉर्मन्स आकर्षण ठरणार आहे.


14 व्या आयफा महोत्सवासाठी बॉलिवूड स्टार मंडळींचा येथे दाखल होण्याचा सिलसिला गुरुवारी सुरू झाला. यंदा नृत्य दिग्दर्शक प्रभुदेवा व श्रीदेवी यांचे नृत्य हे मुख्य आकर्षण असेल. दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्रित सादरीकरण करणार आहेत.


मुख्य पुरस्कार समारंभात माधुरी दीक्षित, आयुष्मान खुराणा, जॅकलिन फर्नांडिस, सोफी चौधरी, दिया मिर्झा, अर्जुन कपूर, सोनू सूद हेदेखील सादरीकरण करणार आहेत. खांद्यावरील शस्त्रक्रियेमुळे शाहरुख खान परफॉर्म करणार नाही. परंतु शाहिद कपूरसोबत सूत्रसंचालन करणार आहे. श्रीदेवीचे शनिवारी प्रभुदेवासोबत नृत्य होणार आहे. परंतु हे काम अत्यंत आव्हानात्मक असल्याची प्रांजळ कबुली अभिनेत्री श्रीदेवीने दिली आहे.


ग्रँड एंट्री : सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोन व माधुरी दीक्षित यांचा या समारंभातील प्रवेश भव्य स्वरूपाचा असेल. आपण या समारंभाची अतिशय उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत, अशी प्रतिक्रिया शाहरुखने दिली. पांढ-या डेनिमचा पोषाख केलेल्या 47 वर्षीय शाहरुखचे मकाउमध्ये त्याच्या चाहत्यांकडून जबरदस्त स्वागत झाले.


अनुपम खेर यांची अभिनयाची शाळा
वॅनिशियन बॉलरूममध्ये शुक्रवारी अनुपम खेर यांनी अभिनयाची कार्यशाळा घेतली. त्याची थीम ‘100 इयर्स ऑफ इंडियन सिनेमा- अ‍ॅक्टर प्रिपेयर्स ’ अशी होती. या ठिकाणापासून काही अंतरावर शाहरुख खान व श्रीदेवीच्या एंट्रीमुळे प्रसारमाध्यमे भलेही तिकडे धावली असली तरी प्रेक्षागृहात जे घडले ते अगदीच कमाल म्हटले पाहिजे. अनुपम खेर यांनी अभिनय, तंत्रज्ञान, बॉडी लँग्वेज, ध्वनीचा वापर, उच्चार इत्यादी बारकावे अतिशय रंजक उदाहरणातून स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी सफाई कामगार, अटेंडंट, पत्रकार, सामान्य दर्शक या नॉन अ‍ॅक्टर्सना व्यासपीठावर बोलावले. त्यांना प्रोत्साहन आणि थोडे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून चांगले प्रदर्शन करून घेतले. अभिनयाची कोणतीही भाषा नसते. ती समजावून सांगण्यासाठी त्यांनी एका चिनी तरुणीशी हिंदीतून संभाषण करून दाखवले. केवळ हावभावाच्या मदतीने त्यांनी उपस्थितांना पोटधरून हसायला लावले.