आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Producers Director's Film Festivel In Mumbai On October

मुंबईत महिला निर्मात्या- दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा ऑक्टोबरमध्ये महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणा-या बॉलीवूडमध्ये काही महिलांनीही निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या महिलांच्या निवडक चित्रपटांचा महोत्सव ‘मुंबई वुमेन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ नावाने 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.


या महोत्सवात प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान आणि शबाना आझमी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. महिला चित्रकर्मींचा हा देशातील पहिलाच चित्रपट महोत्सव आहे.ओकॅलस क्रिएशन द्वारा आयोजित महोत्सवाला महाराष्ट्र पर्यटन मंडळाने विशेष साहाय्य देऊ केले आहे. पीयूष मिश्रा, शर्मिष्ठा रॉय, अपर्णा सूद, रचना रस्तोगी, हनी इराणी, कमलेश पांडे, अशिमा छिब्बर, अरुणा राजे आदी मान्यवर या महोत्सवातील प्रतिनिधींसाठी एक कार्यशाळा घेऊन चित्रपट निर्मितीची माहितीही देणार आहेत.


महोत्सवात नंदिता दास, रेणुका शहाणे, सुमित्रा भावे, हनी इराणी, झोया अख्तर, रिमा कागती यांच्या चित्रपटांसह 70 देशांमधील 150 चित्रपट मुंबईतील सात ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत. या वेळी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘लक बाय चान्स’, ‘टर्निंग 30’, ‘तलाश’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’, ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’, ‘फिराक’, ‘अरमान’, ‘स्पर्श’, ‘रामचंद पाकिस्तानी’, ‘रिटा’, ‘देवरी’, ‘मला आई व्हायचंय’, ‘हॉलीवूडची दिग्दर्शिका निशा गणात्राचे ‘चटनी पॉपकॉर्न’ आणि ‘कॉस्मोपॉलिटन’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे या महोत्सवाबद्दल देश-विदेशातही उत्सुकता आहे.


फातमा बेगम यांच्या नावाने पुरस्कार
महोत्सवात सरोज खान यांचा सत्कार करण्यात येणार असून निधी तुली यांनी त्यांच्या जीवनावर तयार केलेला ‘द सरोज खान स्टोरी’ हा लघुपटही दाखवण्यात येणार आहे. या वेळी शबाना आझमी यांचाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामाबाबत सत्कार करण्यात येणार आहे. देशातील पहिली महिला दिग्दर्शिका फातमा बेगम यांच्या नावाने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.