आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पन्नास वर्षांपूर्वीचा काळ... स्थळ- नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियम..... 1962 मधल्या चिनी आक्रमणातील पराभवाने हताश झालेला देश.... अशा वातावरणात चित्रपट उद्योगाच्या वतीने 27 जानेवारी 1963 रोजी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आर्त-व्याकूळ स्वरात एका देशभक्तिपर रचनेचे प्रथमच सादरीकरण झाले आणि तो सुरेल पण भावव्याकूळ क्षण काळाच्या सीमा पार करून अजरामर झाला...चिनी आक्रमणात देशासाठी लढताना प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर जवानांसाठी कवी प्रदीप, संगीतकार सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांनी देशवासीयांना घातलेली जागे होण्याची ती साद विलक्षण होती...त्या शब्दांनी, स्वरसंगतींनी आणि गायनाने उभा देश हेलावला...ती रचना ऐकणा-या तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचेही डोळे भरून आले....
कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी ही आठवण सांगितली. संगीतकार सी रामचंद्र यांचे आत्मचरित्र ‘माझ्या जीवनाची सरगम’मध्ये या घटनेचा संदर्भ आहे. त्यात त्यांनी 27 जानेवारी 1963 रोजी दुपारी अडीच वाजता दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर लाखो नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत हे गीत सादर झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार या आठवड्यात या गाण्याच्या सादरीकरणाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे.
प्रदीप यांच्या शब्दाशब्दांतून आपल्या देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या जवानांचे शौर्य, त्यांचा पराक्रम, देशाविषयी, देशवासीयांविषयीचे प्रेम, कर्तव्याची जाणीव...अशा भावनांचे कल्लोळ ओतप्रोत भरले होते. सी. रामचंद्र यांनी दिलेली चाल ऐकताक्षणी ठाव घेणारी आणि लतादीदींचा स्वर्गीय स्वर काळजाला थेट भिडणारे ठरले.
पं. नेहरू आणि प्रदीप यांची भेट
हे गीत सादर होत असताना त्या शब्दांनी भारावून पं. नेहरूंनी कवी प्रदीप यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ही भेट 21 मार्च 1963 रोजी मुंबईत झाली. प्रदीपजी यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, या भेटीत नेहरू यांनी प्रदीप यांना ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत पुन्हा ऐकवण्याची विनंती केली आणि त्याला मान देत प्रदीप यांनी हे गीत सादर केले होते, अशी आठवणही मितुल यांनी सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.