आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लखलखत्या तारे-तारकांच्या हजेरीत रंगला झी गौरव पुरस्कार सोहळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत मानाचा मानला जाणारा झी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात थाटात पार पडला.

यंदाच्या झी गौरव पुरस्कारांमध्ये रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या ‘बालक पालक’ सिनेमाने तब्बल सात पुरस्कार आपल्या नावी करुन बाजी मारली. या सिनेमाने संकलन, पार्श्वगायक, पार्श्वसंगीत, छायाचित्रण, पटकथा, दिग्दर्शन आणि सिनेमा असे एकूण सात पुरस्कार आपल्या नावी केले. तर लक्षवेधी सिनेमा म्हणून ‘भारत माझा’ या सिनेमाला गौरविण्यात आले.

व्यावसायिक नाट्य विभागामध्ये ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, लेखन, संगीत, दिग्दर्शन याचबरोबर सर्वोत्कृष्ट नाटक असे एकूण पाच पुरस्कार आपल्या नावी करत बाजी मारली. तर लक्षवेधी नाटकाचा मान 'प्रपोजल'ला मिळाला. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘सायलेंट स्कीम’ सर्वोत्कृष्ट ठरले.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत संगीत क्षेत्रात अनमोल योगदान देणारे ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडित जसराज यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सन्मान करण्यात आला. तर मराठी नाट्यासृष्टीत आपल्या सुमारे साडे दहा हजार नाट्यप्रयोगांचा जागतिक विक्रम नोंदवणारे लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष गौरवशाली कारकीर्द पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बॉलिवूडमध्ये आपली ठसठशीत मोहोर उमटवणा-या कलावंताला दरवर्षी 'मराठी पाउल पडते पुढे' या पुरस्काराने झी गौरव सोहळ्यात गौरविण्यात येतं. यावर्षी 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमाद्वारे दमदार पदार्पण करणार-या मराठी दिग्दर्शिका गौरी शिंदे यांना 'मराठी पाउल पडते पुढे' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते गौरी शिंदे यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यंदा झी गौरव पुरस्कार सोहळ्याची थीम होती जत्रा. या सोहळ्यात सुरुवातीपासूनच जत्रेचा संपूर्ण माहौल तयार झाला होता. नीलेश साबळे आणि अभिजीत खांडकेकर यांनी या सोहळ्याचे खुमासदार शैलीत सुत्रसंचालन केले. तर मराठीतील आघाडीच्या अभिनेता-अभिनेत्रींनी धमाकेदार परफॉर्मन्स देऊन या सोहळ्याला चारचाँद लावले.

येत्या 31 मार्चला हा सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा या धमाकेदार सोहळ्याची खास झलक...