आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेत 1946 ते 1949 या कालावधीत घडलेल्या वादविवादांतून देशाची घटना मूर्त स्वरूपात आली. दोन वर्षे, अकरा महिने आणि सतरा दिवस चाललेल्या वाद-संवादांतून आजची घटना कागदावर उतरली. नेमके कोणते विषय या वर्षांत हाताळले गेले? कोण कोण या घटनेवर बारकाईने काम करत होते, या सर्वांचा उलगडा श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘संविधान’ या 10 भागांच्या मालिकेत दाखवण्यात येणार असून यात अभिनेता सचिन खेडेकर यांनी भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून गौरवलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.
गोरेगाव फिल्मसिटीतील स्टुडिओ नंबर 5 सध्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात परिवर्तित झाला आहे. तसेच जवळपास दीडशे कलाकार घटनेमागील कथा सांगण्यासाठी सज्ज झाले आहेत. बेनेगल म्हणाले, आपल्या देशाच्या माता आणि पित्यांनी देशाला लोकशाहीचे स्वरूप देण्यासाठी हाताळलेले विषय आणि केलेले तर्कसंगत वाद यांचे कथन ‘संविधान’ या मालिकेतून करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ऐतिहासिक सत्याला धक्का न लावता, ड्रामाच्या माध्यमातून ही मालिका अधिकाधिक रंजक आणि शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्याचा प्रयत्न केला आहे. श्यामा झैदी आणि अतुल तिवारी यांनी या मालिकेची कथा व पटकथा लिहिली आहे. दिलीप रमानी, टॉम अल्टर, राजेंद्र गुप्ता, रजीत कपूर, उत्कर्ष मुजूमदार, दिव्या दत्ता, राजेश्वरी सचदेव यांच्याही या मालिकेत भूमिका आहेत.
राज्यसभा टीव्हीची निर्मिती
लोकशाहीचे स्वप्न घटनेद्वारे सत्यात उतरवणारी ‘संविधान’ ही 10 भागांची मालिका दीड वर्ष संशोधन आणि बारकावे गोळा करून तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या मालिकेची निर्मिती राज्यसभा टीव्हीने केली असल्याने ऐतिहासिक मालिका व्हिडिओ स्वरूपात जतन राहील, असे राज्यसभा टेलिव्हिजनचे कार्यकारी संचालक राजेश बादल यांनी सांगितले. जानेवारी 2014 मध्ये ही मालिका प्रसारित केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.