मुंबई - लाइफ ओके वाहिनीवर प्रसारित होणारी देवों के देव महादेव ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. महादेवावर आधारित ही पौराणिक मालिका आहे. डिसेंबर 2011मध्ये ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. स्टारकास्टमुळे ही मालिका विशेष चर्चेत आहे. महादेवाच्या भूमिकेत अभिनेता मोहित रैनाने जीव ओतला, तर पूजा बोस पार्वतीच्या भूमिकेत झळकत आहे. खरं तर सुरुवातीला पार्वतीची भूमिका सोनारिका भदोरिया साकारत होती. मात्र सोनारिकाने मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर पूजा बोसची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली. पूजानेसुद्धा पार्वतीची भूमिका जिवंत केली. जाणून घेऊया पूजाविषयी बरेच काही...
मुळची राजस्थानची-
पूजाचा जन्म जयपूर, राजस्थानमध्ये झाला. आता ती मुंबईत स्थायिक झाली आहे. अभिनयासोबतच मॉडेलिंगमध्येही ती आपले करिअर बनवत आहे. तुझ संग प्रीत लगाई सजना या मालिकेमुळे तिला ओळख प्राप्त झाली. त्यानंतर तिला देवों के देव महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे पूजा घराघरांत पोहोचली.
टीव्हीवरील पदार्पण-
'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'देवों के देव महादेव' या मालिकांमुळे पूजा प्रसिद्धीझोतात आली. मात्र तिने छोट्या पडद्यावर पहिले पाऊल ठेवले ते एकता कपूरच्या 'कहानी हमारे महाभारत' की या मालिकेद्वारे. या मालिकेत तिने कृष्णाची प्रेयसी राधाची भूमिका साकारली होती. ही मालिका विशेष गाजली नाही आणि केवळ चार महिन्यांतच ती डबाबंद झाली. याशिवाय इमॅजिन वाहिनीवरील 'सर्वगुण संपन्न' या मालिकेतही पूजाने काम केले आहे.
फिल्मी करिअर-
पूजाने केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. बंगाली सिनेमांद्वारे पूजाने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. 'माचो मस्ताना' (2012), 'चैलेंज-2' (2013), 'लवरिया' (2013) आणि 'तीन पत्ती' (2014) या बंगाली सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. याशिवाय एक तेलगू सिनेमाही तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये 'राजधानी एक्स्प्रेस' (2013) या सिनेमांत
लिएंडर पेससोबत पूजाने काम केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'देवों के देव महादेव'मधील पार्वती उर्फ पूजा बोसचा खास अंदाज...