आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Life Story Of Comedian Kis Kisko Pyaar Karu Fame Kapil Sharma

कधीकाळी असा दिसायचा कॉमेडियन कपिल शर्मा, नशीब पालटले आणि झाला बॉलिवूड अॅक्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करु' हा पहिलावहिला बॉलिवूड सिनेमा या शुक्रवारी रिलीज होतोय. दिग्दर्शक अब्बास-मस्तान दिग्दर्शित या सिनेमात कपिलची शिव, राम, किशन आणि कुमार ही नावे आहेत. नावे जरी चार असली तरी व्यक्ती मात्र एकच आहे. त्याने आपली ही नावे कॅसेनोवा इमेजमुळे ठेवली आहेत. सिनेमात त्याची तीन लग्ने झाली असून त्याची एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे. हे तर झाले कपिलच्या रिल लाइफबद्दल, जी पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणारेय. divyamarathi.com आज तुम्हाला कपिलच्या खासगी आयुष्याची कहाणी सांगत आहे.
अमृतसरमध्ये झाला जन्म
कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या कपिलचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्याची आई त्याला प्रेमाने टोनी म्हणून बोलावते. त्याचे वडील जितेंद्र शर्मा पोलिस हवालदार होते, तर आई राणी गृहिणी आहेत. कपिलला दोन बहीणभावंड आहेत. भावाचे नाव अशोक शर्मा आणि बहिणीचे नाव पूजा शर्मा आहे. कपिल 15 वर्षांचा असताना कॅन्सरमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा तो दहाव्या वर्गात शिकत होता.
पंडीत बैजनाथ हायस्कूलमधून घेतले शिक्षण
कपिलने नर्सरी ते बारावीपर्यंतचे शिक्षण अमृतसर येथील पंडीत बैजनाथ हायस्कूलमधून घेतले. या शाळेचे प्राध्यापक राजीव कामारिया यांनी सांगितले, "कपिलला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. फार कमी वयात त्याने अभिनय सुरु केला होता. मिमिक्रीत त्याचा हातखंडा होता. तो जेव्हा मोठ्या स्टार्सची मिमिक्री करायचा तेव्हा टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. प्रत्येकजण कपिलचे कौतुक करायचा." कपिलच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानाविषयी राजीव यांनी सांगितले, "त्याला इंग्रजी विषय पसंत आहे. शालेय जीवनात मी त्याला इंग्रजी विषय शिकवायचो. आता खूप गोष्टी बदलल्या आहेत. मला आनंद आहे, की त्याने स्वतःला खूप इम्प्रूव केले."
शालेय शिक्षणानंतर हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कपिलने पुढील शिक्षणासाठी अमृतसर येथील हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथील विद्यार्थ्यांनासुद्धा त्याने आपले कौशल्य दाखवले. वडिलांच्या निधनाचे दुःख लपवत तो इतरांच्या चेह-यावर हास्य फुलवायचा.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर पंजाब नाट्यशाळेत घेतला प्रवेश
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर कपिलने पंजाब नाट्यशाळेत प्रवेश घेतला. येथे तो अभिनय सादर करायचा शिवाय तेथील तरुणांना अभिनयाचे धडेसुद्धा द्यायचा. कपिलने सर्वप्रथम एका पंजाबी सिनेमात अभिनय केला आणि आता तो बॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
टीव्हीचा पॉप्युलर शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक प्रसिद्ध शो ठरला आहे. कपिल छोट्या पडद्यावरील सर्वाधिक महागडा टीव्ही होस्ट ठरला आहे. रंगभूमीवरुन करिअरची सुरुवात करणा-या कपिलने आता यशोशिखर गाठले आहे. मात्र त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. रंगभूमीवर काम करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आपल्या कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे तो यशोखिरावर पोहोचला.
"मित्रांचा मित्र आहे कपिल"
divyamarathi.comने कपिलचे थोरले भाऊ अशोक शर्मा यांच्याशी काही दिवसांपूर्वी बातचित केली होती. त्यांनी सांगितले, "मित्रांचा मित्र आहे कपिल. मला त्याचा अभिमान वाटतो. लोक आम्हाला त्याच्यामुळेच ओळखतात. त्याने लवकरात लवकर लग्न करुन आपल्या संसाराला सुरुवात करावी, अशी माझी इच्छा आहे. सुरुवातीच्या काळात 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या केवळ 21 एपिसोडला वाहिनीकडून परवानगी मिळाली होती. मात्र लोकप्रियता बघून याचे 100 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत आणि आजही यशस्वीरित्या हा शो सुरु आहे. कपिलचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आणि आज मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण कॉमेडीचा किंग बनला आहे."
कपिल मोठा माणूस बनला यावर आईचा विश्वासच बसत नाही
कपिलच्या मातोश्री राणी शर्मा अमृतसर येथील संजीत एवेन्यूमध्ये वास्तव्याला आहेत. आपला मुलगा एवढा प्रसिद्ध झाला, यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. divyamarathi.comला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "मला माझ्या मुलाचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र त्याच्या प्रकृतीविषयी मला काळजी वाटते. इतरांच्या चेह-यावर हास्य फुलवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याला राजमा आणि सरसों का साग खूप आवडतं. तो दिवसाला केवळ एकदाच जेवतो. यावर्षी दिवाळीला तो अमृतसरमध्ये आला होता. याविषयी त्याने कुणालाही कळवले नव्हते. त्याने येथे येऊन आम्हाला सरप्राइज दिले. त्याने आपले आठ किलो वजन कमी केले आहे आणि मलाही वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. मला टोनीच्या तब्येतीची विशेष काळजी वाटते."
जुन्या आठवणींना उजाळा देताना राणी शर्मा यांनी सांगितले होते, "यशस्वी कॉमेडियन बनण्यापूर्वी टोनीने पंधरा वर्षे रंगभूमीवर काम केले. त्याच्या वडिलांनासुद्धा अभिनयाची आवड होती."
लग्नासाठी अद्याप तयार नाही कपिल
जेव्हा आम्ही कपिलच्या आईंना त्याच्या लग्नाविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, "मी माझ्या सूनेला बघण्यासाठी आतुर झाले आहे. मात्र कपिल लग्नासाठी तयार नाहीये. त्याच्याकडे लग्नासाठी वेळच नाही. आता त्याने बॉलिवूड सिनेमा साइन केला आहे. हा सिनेमा पूर्ण होताहोता कदाचित तो लग्नसाठी तयार होईल. तो स्वतः आपल्या जोडीदाराची निवड करणार आहे." कपिलचा त्याची पुतणी कायना शर्मावर खूप जीव आहे. जेव्हा ही छोटी प्रिन्सेस त्याला 'चाचू, बाबाजी का ठुल्लू' म्हणून बोलावते, त्याला खूप चांगले वाटते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कपिलची संघर्षाच्या काळातील छायाचित्रे...