आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sofiya Arman Quarral : Police Entered After Ending The Big Boss Show

सोफिया-अरमान यांच्यातील वाद;शो संपताच बिग बॉसच्या घरात पोलिसांची ‘एंट्री’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘बिग बॉस’चे घर नेहमीच वादविवादांसाठी चर्चेत राहिले आहे. पण यंदा शोच्या फिनालेनंतरही या घरात हालचाली दिसून आल्या. शोचा अंतिम भाग संपताच पोलिसांनी बिग बॉच्या या घरात एंट्री घेतली. अरमान कोहली आणि सोफिया हयात यांच्यात झालेल्या वादाविषयी माहिती घेण्यासाठी पोलिस बिग बॉसच्या घरात आले होते.
बिग बॉसच्या सातव्या पर्वातील कुटुंबाचे सदस्य असणा-या अरमान कोहली आणि सोफिया हयात यांच्यात घरामध्ये वाद झाला होता. या वेळी झालेल्या झटापटीत सोफियाच्या चेह-याला झाडूची मागची काडी लागली होती. यावरून घरामध्ये मोठ्या प्रमाणावर वादही झाला. पण घरातून बाहेर पडताच सोफिया हयातने थेट पोलिस ठाणे गाठले आणि अरमान कोहलीविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर अरमानला घरातून अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा घरातही गेला. पण या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. त्याच तपासाच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणजे पोलिसांनी शनिवारी शोच्या शेवटच्या भागानंतर बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. तसेच पोलिसांनी घरातील कॅमे-यांचे फुटेज मिळवल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या वादानंतर अटक झालेल्या अरमानला लगेच जामीन मिळाल्याने सोफिया बरीच नाराज झाली. त्यामुळे तिने शोच्या अंतिम भागात सहभागी होणार नसल्याचेही आधीच सांगितले होते. बिग बॉसच्या करारानुसार माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, बिग बॉसने आपले संरक्षण केली नाही, अशी तक्रार सोफियाने केली आहे.
उपविजेती तनीषाच्या स्वागतास तनुजा
‘बिग बॉस’ची उपविजेती ठरलेली तनीषा मुखर्जी हिच्या स्वागतासाठी तिची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा हिने अखेर भागात हजेरी लावली होती. आपल्या मुलीचा अभिमान असल्याचे तनुजाने या वेळी सांगितले. दरम्यान, अंतिम भागानंतर तनीषाला अरमानबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता, आम्ही दोघे फक्त मित्र असल्याचे तिने सांगितले. आम्ही दोघांनी घरात एकमेकांना फक्त मदत केली होती. तसेच आमच्या मैत्रीला कुटुंबीयांची काहीही हरकत नसल्याचे स्पष्टीकरणही तनीषाने दिले. दरम्यान, बिग बॉसप्रमाणेच बिग ब्रदरमध्ये सहभागी होण्यासाठीही तनीषाला विचारणा करण्यात आली होती. मात्र, बिग बॉसमध्येच समाधानी असून बिग ब्रदरमध्ये सहभागी होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.