'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी रिअॅलिटी शोमधील 'गुत्थी' या पात्रामुळे प्रसिद्धीझोतात आलेला विनोदवीर सुनील ग्रोव्हर एका नव्या वादात अडकला आहे. शीव-पनवेल महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीने मारुती अल्टोला धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पुण्याकडून वाशीकडे जात असलेल्या अल्टो गाडीला खारघर स्थानकानजीक ग्रोव्हरच्या गाडीने धडक दिली. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात अल्टो गाडीतील ऋषिराज लोखंडे (35), श्रीरंग लोखंडे (55) आणि बाळासाहेब पाटील (36) हे तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात झाला त्यावेळी सुनील ग्रोव्हरचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा अपघात घडला तेव्हा सुनील गाडीत हजर होता. मागील सीटवर तो बसला होता. या अपघातात सुनीलला दुखापत झाली नसल्याचे समजते.