आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयातील ध्रुव ‘तारे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो आपल्या जागेवर अढळ असतो तो म्हणजे ध्रुवतारा! मराठी कलावर्तुळात अशीच एक जागा बनवण्यासाठी सतीश तारे याने संपूर्ण आयुष्य घालवले. वडिलांच्या बालनाट्य संस्थेत नाटुकल्या करता करता सतीश तारे व्यावसायिक रंगभूमी, मालिका आणि चित्रपट असा पल्ला गाठू शकले. ऑल लाइन क्लिअर, कशासाठी पोटासाठी, मोरुची मावशी, जादू तेरी नजर यांसारख्या नाटकांमधून सतीश तारेंनी विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावले. शब्दसामर्थ्य आणि शाब्दिक कोट्यांचा बादशहा असा सतीश तारे ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्यातल्या बतावणीतून नावारूपाला आला. ‘मोरुची मावशी’मध्ये साडीचोळी आणि दागिन्यांनी मढलेला सतीश जितका सुंदर दिसत होता तितकाच सुंदर अभिनय करीत होता. करिअरच्या एका वळणावर दारूचे व्यसन लागले आणि विनोदी भूमिका करणा-या सतीशच्या आयुष्याचा एक विनोद झाला.


बहिष्कारानंतरही लोकप्रियता
नाटक हे कलावंताचे व्यसन असते असे म्हणतात. मात्र, जेव्हा नाटकातल्या कलावंताला व्यसन लागते तेव्हा त्याचे हाल कुत्रेही विचारत नाही याचा अनुभव सतीशने घेतला. दारू पिऊन तालमीला येतो आणि स्वत:ची भर घालून संवाद बदलतो, यामुळे निर्माता संघाने त्याला कामच द्यायचे नाही असा निश्चय केला आणि तब्बल दोन वर्षे त्याच्याकडे काम नव्हते. ज्या शाब्दिक कोट्यांच्या सामर्थ्यासाठी तो ओळखला जायचा त्याच कोट्यांमुळे सतीश अडचणीत आला. आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीही ढासळली. मात्र, त्यानंतर ‘हा हा ही ही हे हे’ या नाटकाद्वारे सतीश पुन्हा रंगभूमीवर आला तो पुन्हा नव्याने पाय रोवण्यासाठीच! त्यानंतर फू बाई फू, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमधून पुन्हा हास्याची उधळण करू लागला. मराठी भाषेवर आणि शाब्दिक कोट्यांवर त्याची असलेली पकड लक्षात घेता नुकतेच ‘गोडगोजिरी’ हे नाटक त्याने नुसतेच लिहिले नाही, तर दिग्दर्शित आणि निर्मितही केले. मात्र, व्यसनाचा परिणाम शरीरावर दिसल्याखेरीज कसा राहील? मागील काही वर्षांपासून तीव्र मधुमेह, खराब झालेले लिव्हर आणि गॅँगरीन झालेला पाय अशा आजारांच्या दुष्टचक्रात हा अभिनयाचा ‘तारे’ अडकला आणि दुर्दैवाने या नाटकाचे फार प्रयोग तो पाहू शकला नाही. आपली जागा मिळवण्यासाठी धडपडणारा हा ध्रुव‘तारे’ अखेरीस
तेज हरवून बसला.