आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे निधन, ताकदीचा विनोदी तारा निखळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे आज (बुधवारी) निधन झाले. जुहूतील सुजय हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. मधुमेहामुळे सतीश तारे यांच्या पायाला गँगरीन झाले होते. तसेच त्यांच्या लिव्हरलाही इजा झाली होती. दादर येथील सुश्रूषा रुग्णालयात त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांना जुहूतील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मंगळवारी रात्री प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी 12च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सतीश तारे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेत्याबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. 'सारेगमप'मधून ते गायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते. झी मराठी वाहिनीवरील 'फू बाई फू'च्या गेल्या पर्वात त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. ताकदीच्या विनोदी अभिनेत्याच्या अशा अचानक एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.