(फोटो - 'रमा माधव' या सिनेमातील मुज-यात अदिती राव हैदरी आणि प्रसाद ओक)
येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणा-या 'रमा माधव' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित मराठी सिनेमाची बरीच चर्चा रंगत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे एक बॉलिवूड स्टार या सिनेमात झळकणार आहे. ही स्टार आहे अदिती राव हैदरी. हिंदीत काही मोजक्या सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर आता अदिती मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' पारंपरिक पोषाख आणि अंगभर दागिन्यांमध्ये मुजरा करताना दिसणार आहे.
'लूट लियो मोहे शाम सावरे बरबात जमुना किनारे' असे या मुज-याचे बोल असून, वैभव जोशीने तो लिहिला आहे. आनंद मोडक यांनी संगीत दिलेल्या या गाण्यास मधुरा दातारने गायले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी आदितीवरील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
या गाण्याविषयी मृणाल यांनी सांगितले, की जेव्हा मी सिनेमात मुजरा चित्रीत करायचे ठरवले, त्यावेळी सरोज खान यांना नृत्यदिग्दर्शन करण्याची मी विनंती केली. मुज-यासाठी आमच्या डोक्यात अनेक नावे होती. मात्र त्यांनी मला अदितीचं नाव सुचवलं. केवळ एका रात्रीत या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
‘रमा माधव’ हा सिनेमा 1760 च्या कालखंडावर बेतलेला आहे. हा काळ मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्या वेळी पुण्यात विशेष समारंभ आणि कार्यक्रमांसाठी नर्तिकांना आमंत्रित केले जायचे. माधवराव पेशवे यांचे काका रघुनाथराव यांच्या आवडत्या नर्तिकेच्या भूमिकेत अदिती दिसेल. लाल रंगाची लेहेंगा-चोली आणि भरगच्च दागिन्यांमध्ये सजलेली आदिती यात पाहायला मिळेल. या गाण्यात अदितीसोबत प्रसाद ओकचंही दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अदितीच्या नृत्याची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सिनेमातील अदितीची दिलखेचक अदा...