नवी दिल्ली - अभिनयात सुपरस्टारचे बिरुद लागल्यानंतर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मात्र
अमिताभ बच्चन यांना मोठे अपयश आले. दिवाळखोरी असते काय, याचा खरा अनुभव आला. या दिवाळखोरीनंतर मात्र
आपण केवळ अभिनयाशी चिकटून राहिलो, अशा शब्दांत
बिग बींनी मन मोकळे केले. 'अजेंडा आज तक २०१४’च्या सत्रात ते बोलत होते.
७२ वर्षीय या सुपरस्टारने १९९५ मध्ये
अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड (एबीसीएल) ही कंपनी स्थापन केली होती. मात्र, या कंपनीमुळे ते कर्जबाजारी झाले. अमिताभ यांनी सांगितले, “त्या काळात आमच्याविरुद्ध ९०-१०० खटले दाखल झाले. घरही गहाण ठेवावे लागले. पूर्ण दिवाळखोर झालो होतो. कंपनी स्थापन करताना जे लोक उत्साहाने माझ्यासोबत काम करायला तयार झाले, तेच लोक नंतर धमक्या देत होते. मी तेव्हा झोपूही शकलो नाही. मला यातून बाहेर पडायचे होते...’ अमिताभ म्हणाले, एक दिवस मी सकाळी उठल्याबरोबर यश चोप्रा यांच्याकडे गेलो. मला काम हवे आहे, असे आग्रहाने सांगितले. त्यांनी मला मोहब्बते हा चित्रपट दिला आणि नव्याने अभिनयाची इनिंग सुरू झाली.
राजकारणात प्रवेश घोडचूक होती...
राजकारणात आपण केलेला प्रवेश म्हणजे एक घोडचूक होती. यानंतर अशी चूक करणार नाही, असे अमिताभ म्हणाले. १९८४ मध्ये त्यांनी अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विजयी होऊनही त्यांनी तीन वर्षांनंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात त्यांनी कधीही राजकारणावर भाष्य केले नाही.