आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व मनसुबे अर्धवटच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी ‘टूरटूर’ पासूनच सतीशला ओळखतो, आता ते किती वर्षे याचा हिशोब करणे कठीण आहे. ‘टूरटूर’मध्ये आम्ही धम्माल केली होती. मला आठवतंय ‘टूरटूर’ संपल्यानंतर सतीश तारेने पुरुषोत्तम बेर्डेंची परवानगी घेऊन पुण्यात तेथील कलाकारांना घेऊन हे नाटक बसवले होते आणि ते पाहण्याचा योग मला आला. इतकी धडपड करत राहणारा असा नट होता सतीश, पण आमची खरी नाळ जुळली ती ‘विच्छा माझी पुरी करा’च्या वेळी. विच्छाचे 100 प्रयोग आम्ही केले असले तरी त्यातल्या बतावणीला मी आणि सतीशने जवळपास 300 ते 400 वेळा सादर केले आहे.


मी लोकनाट्यातला कलाकार आणि तो बालरंगभूमीपासूनचा कसलेला नट त्यामुळे तालीम अशी आम्हाला जास्त लागायचीच नाही. नुकतीच 1 मे रोजी गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठीचा मेळावा होता आणि त्यात माझ्यासोबत सतीशही होता. त्या दिवशीच्या बतावणीत ताजे राजकीय आणि सामाजिक संदर्भ घालून त्याने जी धम्माल उडवून दिली ती पाहण्यासारखी होती. मे महिन्यात विजेसारखा तळपता परफॉर्मन्स देणारा सतीश जुलैमध्ये दिसेनासा होतो हे निश्चितच धक्कादायक आहे.


नुकतेच ‘गोडगोजिरी’ हे
नाटक त्याने लिहिले, दिग्दर्शित केले आणि प्रमुख भूमिकेतही तोच होता. भविष्यात नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याची त्याला इच्छा होती, यातून रंगभूमीवरही पुन्हा पाय रोवण्याचा त्याचा हेतू होता, मात्र ते सर्व मनसुबे अर्धवटच राहिले.

सरस्वतीचे वरदान असणारा तारा
प्रत्येक नटाकडे टायमिंग असावे. मात्र असा उत्कृष्ट टायमिंग असणारा नट म्हणजे सतीश तारे. त्यांच्याकडे असणारा शब्दसंच एवढा मोठा होता की त्यावर एक पुस्तक निघेल. त्यांच्या सादरीकरणाचा कधीच प्रेक्षकांना कंटाळा आला नाही. त्यांना सरस्वती प्रसन्न होती, मात्र लक्ष्मी नाही. प्रत्येक वाद्य येणारा माणूस होता. त्यांच्यासारखा नट चित्रपटसृष्टीत कधीच होणार नाही. असा नट जो सप्तता-यांमध्ये आता गेलाय.

- मंगेश देसाई (अभिनेता)