मुंबई - 2000मध्ये एक सिनेमा आला होता, त्याचे नाव होते 'कहो ना प्यार है'. या सिनेमाने तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेल या नवोदीत चेह-यालासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली. या सिनेमाद्वारे हृतिक आणि अमिषाने बी टाऊनमध्ये पदार्पण केले होते.
आज हृतिक सुपरस्टार आहे, मात्र अमिषा हळूहळू आपली ओळख विसरत चालली आहे. इतकेच नाही तर लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी तिला बोल्ड फोटोशूटची मदत घ्यावी लागत आहे. बोल्ड फोटोशूटमुळे तिच्यावर टीकाही झाली आहे.
2001मध्ये अमिषाचा 'गदर' हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा सुपरडूपर हिट ठरला होता. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. मात्र आता शकीनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे.
हे सर्व आम्ही तुम्हाला यासाठी सांगत आहोत, कारण आज अमिषाचा वाढदिवस आहे. 7 जून 1976 रोजी जन्मलेल्या अमिषा पटेलने आज आपल्या वयाची 38वर्षे पूर्ण केली आहेत. आज अमिषाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या करिअरवर...
'कहो ना प्यार है'पासून ते 'शॉर्टकट रोमिओ'पर्यंतचा अमिषाचा प्रवास...
'कहो ना प्यार है' सारख्या सुपरहिट सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरु करणा-या अमिषाच्या पदरी लीड अभिनेत्री म्हणून केवळ तीन ते चार सिनेमे जमा आहेत. या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. यामध्ये 'गदर: एक प्रेम कथा',
'हमराज' आणि 'पुडिया गीथे' या तामिळ सिनेमाचा समावेश आहे.
आत्तापर्यंत अमिषाने 30हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र आपल्या समवयीन अभिनेत्रींप्रमाणे ती आपले स्थान टिकवून ठेऊ शकली नाही. अमिषाने आपल्या करिअरमध्ये हृतिक रोशन, सनी देओल, आमिर खान,
सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त आणि
अक्षय कुमार या स्टार्ससह काम केले. मात्र त्याचा फायदा अमिषाला आपल्या करिअरमध्ये विशेष झाला नाही. हृतिक आणि सनी देओलसोबतचे सिनेमे वगळ्यास इतर स्टार्ससोबतचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत.
इकॉनॉमिक्समध्ये आहे गोल्ड मेडलिस्ट, निवडले फिल्मी करिअर...
अमिषा पटेल प्रसिद्ध राजकारणी रजनी पटेल यांची नात आहे. तिचे आजोबा एकेकाळी मुंबई काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. अमिषाने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे. अमिषाचे नाव तिचे वडील अमित आणि आई आशा यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. तिने कॅथेड्रल अँड जॉन कॅनन शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1992 मध्ये इकॉनॉमिक्स या विषयात पदवी प्राप्त करण्यासाठी मॅसाचुसेट्सला रवाना झाली. येथे तिने इकॉनॉमिक्स या कठीण विषयात गोल्ड मेडल प्राप्त केले.
पदवीप्राप्त केल्यानंतर तिने खंडवाला सिक्युरिटी लिमिटेडमध्ये इकॉनॉमिक एनालिस्ट म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. मात्र फार काळ तिने येथे काम केले नाही. त्यानंतर ती भारतात परतली आणि सत्यदेव दुबे यांचे थिएटर जॉईन केले.
सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर बोल्ड फोटोशूटमुळे आली प्रसिद्धीझोतात....
अलीकडेच एका फोटोशूटमध्ये टॉपलेस होऊन अमिषाने खळबळ उडवून दिली होती. तसे पाहता अमिषाने पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट केलेले नाहीये. लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अमिषाने अनेकदा बोल्ड फोटोशूट केले आहे. आपल्या करिअरमध्ये साध्या-सोज्वळ भूमिका साकारणा-या अमिषाने मॅक्सिम मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट पाहून सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अमिषाची बालपणीची आणि बोल्ड फोटोशूटची काही निवडक छायाचित्रे...