आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'भद्रकाली\'च्या नव्या सिनेमाची धुरा मनवा नाईककडे, करणार \'पुरुषार्थ\'चे दिग्दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मालवणचो चमचमीत मसालो प्रेक्षकांना बहाल करीत दिवंगत नाटककार मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनने यंदा 32 व्या वर्षात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर ‘पुरुषार्थ’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच एका कार्यक्रमात मुंबईत करण्यात आली असून याचे दिग्दर्शन मनवा नाईक करणार आहे, तर चिन्मय मांडलेकर
यांनी कथा लिहिली आहे.


प्रॉडक्शनच्या 32 व्या वर्षाचे औचित्य साधत नाट्य आणि चित्रपटनिर्मितीत उतरत असल्याची घोषणा प्रसाद कांबळी यांनी या वेळी केली. या कार्यक्रमाला आमदार भाई जगताप, दिलीप वेंगसरकर, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, मोहन जोशी, महेश लिमये, सुकन्या कुलकर्णी, स्वप्निल जोशी, हृषीकेश जोशी, मनवा नाईक, पॅडी कांबळे, भरत जाधव यांची उपस्थिती होती.


प्रसिद्ध अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांनी अजरामर केलेल्या ‘पांडगो इलो रं बा इलो’ आणि ‘हलकं फुलकं’ या दोन नाटकांना पुन्हा रंगभूमीवर नव्याने सादर करण्यात येणार आहे. याची धुरा वैभव मांगले आणि प्रियदर्शन जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘येवा कोकण आपलोच असा’ असे म्हणत मालवणी भाषेला व्यावसायिक रंगभूमी मिळवून देणा-या कांबळी यांनी स्वबळावर ‘भद्रकाली प्रॉडक्शन’ची स्थापना केली. ‘केला तुका झाला माका’, ‘करतलो तो भोगतलो’, ‘सावळो गोंधळ’, ‘चाकरमानी’, ‘मालवणी सौभद्र’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली. आता भद्रकाली प्रॉडक्शनची जबाबदारी प्रसाद कांबळी यांनीही अतिशय समर्थपणे सांभाळली आहे.

‘संशयकल्लोळ’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘बेचकी’, ‘नांदी’ अशा नवनव्या संकल्पनांना फोडणी देण्याचे काम निर्माता म्हणून प्रसाद कांबळी यांनी केले. त्यामुळे कांबळी यांच्या नव्या भूमिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे चित्रपटसृष्टीने लक्ष लागले आहे.