आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'ची मराठी आवृत्ती लवकरच, सुत्रसंचालकाच्या भूमिकेत रितेश देशमुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' हा रिअ‍ॅलिटी शो हिंदीत गाजल्यानंतर आता याची मराठी आवृत्ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसारखाच मराठी सेलिब्रिटींना घेऊन 'मराठी बिग बॉस' छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अभिनेता रितेश देशमुख व नीतेश राणे यांनी तयार केली आहे. त्यामुळे हिंदी 'बिग बॉस'सारखे आलिशान घर आता मराठी वाहिनीवर अवतरणार आहे.

या शोचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता रितेश देशमुख मराठी बिग बॉसचे सुत्रसंचालन करणार आहे. 'बालक पालक' या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून रितेश देशमुखचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले आहे. शिवाय 'लई भारी' या मराठी सिनेमातसुद्धा काम करणार असल्याची घोषणा अलीकडेच रितेशने केली. आता 'बिग बॉस'च्या रुपाने रितेश छोट्या पडद्यावरही दाखल होणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल, हे काही वेगळे सांगायला नको.

हिंदी बिग बॉसचे सहाही सिझन त्यातील हेवेदावे, वादग्रस्त व्यक्ती आणि शिवीगाळ यामुळे वादग्रस्त ठरले होते. मात्र हिंदीप्रमाणे मराठी बिग बॉस आक्षेपार्ह ठरणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

'बिग बॉस'च्या मराठी आवृत्तीत अनुष्का दांडेकर, मानसी नाईक, मिलिंद सोमण, पंढरीनाथ कांबळे, महेश मांजरेकर, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, रिमा लागू, निर्मिती सावंत, अविनाश आणि ऐश्वर्या नारकर, अतुल कुलकर्णी, रेणुका शहाणे, अवधूत गुप्ते, भरत जाधव या मराठीतल्या प्रसिद्ध कलाकारांबरोबर राजकारणी आणि खेळाडूंचाही समावेश करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

एकंदरीतच काय तर हिंदीतील बिग बॉसच्या सहाही पर्वांची चव प्रेक्षकांनी चाखली. आता 'मराठी बिग बॉस'ची चव प्रेक्षकांना आवडणार की ती बेचव ठरणार हेसुद्धा लवकरच स्पष्ट होईल.