आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Ritesh Deshmukh, Marathi Movie Lai Bhari News In Marathi

‘लॉबी’चा फटका: रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने केली ‘अनवट’ची मुस्कटदाबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलीवूडमध्ये करण जोहर, यशराज बॅनर्स, सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांच्या लॉबीमुळे इतर चित्रपटांना थिएटर्सच्या बाबतीत व प्रदर्शनाच्या तारखांच्या बाबतीत जो फटका बसतो तसाच फटका आता मराठीमध्येही बसायला लागला आहे. बडे निर्माते, राजकारण्यांची लॉबी तयार झाल्याने छोट्या बजेटच्या वा उत्तम दर्जा असणार्‍या मराठी चित्रपटांचीही ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. अलीकडेच प्रदर्शित ‘अनवट’ला याचा फटका बसला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मनसेचे अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे यांची निर्मिती असलेला ‘लय भारी’ हा प्रदर्शित झालेला चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर स्वत:ची एकहाती सत्ता गाजवण्यासाठी इतर मराठी चित्रपटांची मुस्कटदाबी करत आहे. इतर मराठी चित्रपटांना तारखा द्यायच्या नाहीत असे मनसेने महाराष्ट्रभरातल्या मल्टिप्लेक्सना धमकावल्यामुळे नीलेश नवलखा आर्ट्स आणि होली बसील यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘अनवट’ या चित्रपटाला अत्यल्प मल्टिप्लेक्समध्ये झळकता आले असल्याची चर्चा आहे. एकेकाळी अशी मक्तेदारी नितीन चंद्रकांत देसाई, महेश मांजरेकर यांची असायची, तर आता एक खासगी वाहिनी, रवी जाधव, संजय जाधव, मनसे, शिवसेना अशा संस्था, दिग्दर्शक व राजकीय पक्षांची मक्तेदारी सुरू आहे. ‘रेगे’पुढे नुकतीच माघार घेतलेल्या ‘लोकमान्य’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीची सूत्रे झीटीव्हीने घेतल्याने लोकमान्यमुळे पुढेदेखील इतर मराठी चित्रपटांना महिनाभर फटका बसू शकतो, तर ‘रेगे’ व ‘लय भारी’चा फटका याआधी ‘अनवट’बरोबर ‘पोश्टर बॉइज’लादेखील बसला आहे.

‘लय भारी’ चित्रपटाबरोबर स्पर्धा वा कुठलाही वाद नको म्हणून ‘लय भारी’प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ‘अनवट’ 25 जुलै रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.

‘किक’शी मात्र सूत जुळवले
सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटाच्या बाबत मात्र मनसेने संगनमत केले आहे. ‘अनवट’च्या निर्मात्यांनीदेखील पूरक मल्टिप्लेक्स न मिळाल्याने ‘अनवट’ला हा तोटा झाला असल्याचे सांगत मनसेच्या मुस्कटदाबीबाबत मात्र बोलायचे टाळले. ऑगस्ट महिना संपेपर्यंत मनसेची ही दहशत मल्टिप्लेक्सवर ‘लय भारी’ व ‘रेगे’च्या निमित्ताने कायम राहणार आहे.
‘अनवट’ला मिळालेले शो
महाराष्ट्र : 35-36
महत्त्वाची शहरे
औरंगाबाद 2
पुणे 10
मुंबई 11
नाशिक 00

‘लय भारी’ दुसर्‍या आठवड्यातही : 250 थिएटर्स
कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांतदेखील बड्या थिएटर्समध्ये अद्याप सुरू आहे.