आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यांच्या गुंतागुंतीवर आधारित \'हुतूतू\' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाती आयुष्य व्यापून टाकणारी, जगण्याला सुंदर करणारी असतात तर काही नाती सहवासाने बहरलेली असतात. काही दूर असूनदेखील मनाच्या जवळ असतात. काही लादली जातात, तर काही नाती क्षणभरात आयुष्यात येतात. रोजच्या गर्दीत अथवा फेसबुकवर एका क्लिकनेदेखील जुळतात. असे हे नाते कसेही असले तरी त्यात प्रेमाचा स्पर्श असेल तरच ते बहरून येते, आणि आयुष्यभर टिकून देखील राहते. नात्यांच्या गुंतागुंतीवर आधारीत 'हुतूतू' हा नवा मल्टिस्टारर सिनेमा घेऊन दिग्दर्शिका आणि अभिनेत्री कांचन अधिकारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. एकमेकांना धोबीपछाड देत रंगलेली त्यांची आगामी मनोरंजन कलाकृती प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहे.
त्याग आणि सर्मपणाला प्रेम मानणा-यांचा एक संघ तसेच प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणा-या धुंद पिढीचा दुसरा संघ असा या सिनेमात दोन संघांमध्ये एक सामना रंगणार आहे. प्रेम मिळवण्यासाठी जिव्हाळ्याच्या नात्यांमध्ये रंगत जाणारा त्यातून उडणारा गोंधळ याचे धमाल चित्रीकरण म्हणजे 'हुतूतू'. प्रसंगानुरूप विनोदाची आतिषबाजीसुध्दा या सिनेमातून बघायला मिळणार आहे.
हर्षवर्धन भोईर आणि भाऊसाहेब भोईर निर्मित आणि कांचन अधिकारी दिग्दर्शित 'हुतूतू' या धमाल कौटुंबिक सिनेमात कलाकारांची तगडी फौज आहे. अशोक सराफ, वर्षा उसगांवकर, प्रदीप पटवर्धन, कांचन अधिकारी, अनंत जोग या दिग्गज कलाकारांसोबत जितेंद्र जोशी, हेमंत, ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, जयवंत भालेराव, अतुल तोडणकर, संजय खापरे या सर्वांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी 'हुतूतू'मध्ये बघायला मिळणार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, ब-याच वर्षानंतर कांचन अधिकारी या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. या सिनेमाचे लेखन आशिष पाथरे यांनी केले असून सिनेमॅटोग्राफी सुरेश देशमाने यांची आहे. सध्या सिनेमाचे शुटिंग चालू असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा सिनेमा रसिक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल असा विश्वास दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशी दुहेरी भूमिका पेलणा-या कांचन अधिकारी यांनी दिला आहे. 'हुतूतू'मध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांच्या जमून आलेल्या उत्तम गट्टीमुळे हा सिनेमा रूपेरी पडद्यावर मनोरंजक खेळ करेल हे निश्चित.
पुढील स्लाइड्वर क्लिक करा आणि बघा 'हुतूतू' सिनेमाच्या कलाकारांची काही निवडक छायाचित्रे...