आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली: विनय आपटे एक जन्मजात स्टार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काही माणसे स्टार म्हणूनच जन्माला येतात. त्यांच्यात तो स्टारपणाचा एक गुण असतो. विनय आपटे त्यातीलच एक होता. आज त्याने या जगाचा निरोप घेतला. अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्याने अतिशय दमदार भूमिका केल्या. परंतु, त्या पाहताना सातत्याने तो व्यावसायिक रंगभूमीसाठीच जन्माला आल्याचे सातत्याने जाणवत होते. आपल्याकडील प्रा. कुमार देशमुख यांच्यासारखेच त्याचे व्यक्तिमत्व होते. अतिशय रुबाबदार आणि ठसठशीत चेहरा, दमदार आवाज आणि पल्लेदार वाक्ये सहजपणे उच्चारण्याची त्याच्या विलक्षण क्षमता होती. त्यामुळेच त्याने अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले होते. अगदी सुरुवातीच्या नाटकांपासून ते अलिकडील काळापर्यंतची त्याची प्रत्येक भूमिका लक्षात राहण्याजोगीच होती. गेल्या काही वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले होते. ‘राजनिती’ या गाजलेल्या मल्टीस्टारर चित्रपटातील त्याची भूमिका प्रदीर्घ काळ स्मरणात राहणारी आहे. साधारणत: 30 वर्षापूर्वी प्रशांत दळवी यांच्या दगड की माती नाटकात त्याची भूमिका होती. त्यावेळी माझे त्याच्याशी बंध जुळले. ते अखेरपर्यंत टिकले. मध्यंतरी त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. उपचारासाठी नाट्य निर्माते सुधीर भट आणि अन्य काही मित्र निधी गोळा करत होते. दुर्दैवाने सुधीर गेला आणि आता विनयही गेला ही खरोखरच फार दु:खदायक घटना आहे. व्यक्तिमत्व आणि भूमिका अशा दोन्हीही अंगांनी विनय रसिकांच्या कायम हृदयात राहणार आहे.