आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरचा ‘धूम 3’ चीनमध्ये प्रदर्शित होणार !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेपेक्षाही चित्रपटांचे मोठे मार्केट असलेला देश म्हणून चीन पुढील वर्षी पुढे येणार आहे. तेथील वाढती बाजारपेठ पाहूनच भारतीय सिनेसृष्टीनेही चीनकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून आमिर खानचा ‘धूम 3’ सिनेमा 26 जुलै रोजी तेथे प्रदर्शित केला जाणार आहे. जवळजवळ 200 थिएटरमध्ये चिनी सबटायटल्ससह हा सिनेमा दाखवला जाणार आहे.
चीनमध्ये भारतीय सिनेमा अभावानेच प्रदर्शित होतात. मात्र, भारतीय सिनेमांसाठी चीनचे दरवाजे उघडे व्हावेत म्हणून वाणिज्य मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चीनने भारतातून प्रत्येक वर्षी पाच सिनेमे आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये फक्त 15 टक्के परदेशी चित्रपट प्रदर्शित होतात. यात सर्वात मोठा वाटा हॉलीवूडचा असून इतर देशांतील सिनेमांचा वाटा 1.5 टक्के आहे. चीनमधील संस्कृतीवर आघात करणारे सिनेमे आयात न करण्याचा निर्णय या देशाने घेतला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.

ड्रॅगनच्या कसोटीवर किंग खान फेल
तंत्रज्ञान, कंटेंट आणि संस्कृती या तीन गोष्टींवर चीनमध्ये भर दिला जातो. या कसोट्यांवर उतरणारे सिनेमेच तेथे प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाते. प्रत्येक वर्षी जगभरातील फक्त 80 सिनेमे चीन आयात करतो. यामध्ये भारतीय सिनेमांचा समावेश व्हावा, असा प्रयत्न केंद्रीय वाणिज्य विभाग करत आहे. तेथील प्रेक्षकांना ‘क्वीन’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमे दाखवण्यात आले. तेही आयात केले जातील, अशीही आशा आहे. चीनमध्ये यापूर्वी सलमानचा ‘वीर’, हृतिकचा ‘क्रिश’ आणि शाहरुखचा ‘माय नेम इज खान’ प्रदर्शित झाले होते, परंतु त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता.