(सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि मुलगी)
मुंबईः प्रसिद्ध सिनेअभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी दीर्घआजाराने निधन झाले. आज त्यांच्या मुळगावी म्हणजे अहमदनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये
आपल्या अभिनयाची छाप सोडणारे गणेशकुमार नरवडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांची गायक होण्याची इच्छा होती. मात्र अनुनासिक आवाज असल्यामुळे ते गायकीत जम बसवू शकले नाही. अभिनय क्षेत्राकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. प्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांचा 'बॉम्बे टॉकीज' हा अमरापूरकर यांचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानच्या सदाशिव अमरापूरकर यांच्या आठवणींना दिबाकर यांनी उजाळा दिला आहे...
"बॉम्बे टॉकीज हा सदाशिव अमरापूरकर यांचा शेवटचा सिनेमा ठरेल, हे कुणाला ठाऊक होते. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. मी त्यांच्याकडे सिनेमाची ऑफर घेऊन गेलो, तेव्हा ते मराठी रंगभूमी आणि सामाजिक कार्यांत व्यस्त होते. मात्र मी त्यांच्याकडे या सिनेमात काम करण्याची गळ घातली. या सिनेमात त्यांची भूमिका मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज पुरुषाची होती. या भूमिकेसाठी तेच योग्य होते. जर हा सिनेमा मी वीस वर्षांपूर्वी बनवला असता, तर या भूमिकेसाठी मी निळू फुले यांची निवड केली असती. मात्र आता सदाशिव यांच्याव्यतिरिक्त दुस-या कुणाचाच या भूमिकेसाठी विचार केला जाऊ शकत नव्हता. सदाशिव यांनी आपल्या भूमिकेसाठी स्वतः संवाद लिहिले होते. ते नेहमी तयारीनिशी सेटवर यायचे. त्यांचे भूमिकेविषयीचे समर्पण पाहून मी दंग झालो होतो. सदाशिव यांनी मला म्हटले होते, की त्यांनी कमर्शिअल सिनेमे केवळ उदरनिर्वाहासाठी केले होते. मराठी रंगभूमीवर ते जास्त रमतात. मला पुन्हा त्यांच्यासोबत काम करायचे होते."
फुफ्फुसात जंतुसंसर्ग मालवली प्राणज्योतः
64 वर्षीय सदाशिव अमरापूरकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली सायली जहागिरदार, केतकी जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत.
11 मे 1950 रोजी एका ब्राम्हण कुटुंबात अहमदनगर येथे त्यांचा झाला होता. त्यांचे खरे नाव गणेश कुमार नरवोडे असे होते. 1974 साली त्यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली. नाटकातून कामाला सुरुवात केल्यावर त्यांनी सदाशिव हे नाव धारण केले. 'तात्या' या नावानेसुद्धा ते सिनेसृष्टीत प्रसिद्ध होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सदाशिव यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचलेल्या मान्यवरांची छायाचित्रे...