भोपाळ - जीवन म्हणजे तडजोड करणे होय.
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तडजोड करण्याची गरज पडल्यास करायलाच हवी. मात्र, स्वप्नांशी कधीच तडजोड करू नये, अशा भावना बॉलीवूड अभिनेता
आमिर खान याने सोमवारी द संस्कार व्हॅली स्कूलमध्ये व्यक्त केल्या. द संस्कार व्हॅली स्कूलमध्ये आयोजित "द राउंड स्क्वेअर कॉन्फरन्स-२०१४'च्या उद्घाटनप्रसंगी तो बोलत होता. ४ ऑक्टोबरपर्यंत चालणा-या या परिषदेसाठी ५ खंडांतील २२ देशांच्या ५१ शाळांमधील ३७५ शिष्टमंडळांनी भाग घेतला आहे.
या वेळी आमिर खानने द संस्कार व्हॅली स्कूलचे डीन ऑफ स्टडीज दिलीप पांडा यांच्याशी चॅट सेशनही केले. या वेळी तो म्हणाला की, जे आपण करतोय त्याने आपल्याला आनंद मिळतोय का, हा प्रश्न आपल्या डोक्यात असायला हवा. सुरुवातीच्या काळात मी समाधानी नसतानाही काही चित्रपट केले. दरम्यान, महेश भट्ट यांनी मला एक स्क्रिप्ट ऐकवली. ती मला आवडली नव्हती. मात्र, त्यांना नकार देणे माझ्यासाठी कठीण होते. शेवटी मी त्यांच्याकडून एक दिवसाचा वेळ मागून त्यांना नकार दिला. तेव्हा मी त्यांना होकार दिला असता तर आज वेगळ्याच ठिकाणी राहिलो असतो, असेही आमिरने या वेळी सांगितले.
काय आहे ‘द राउंड स्क्वेअर’
द राउंड स्क्वेअर हा जगातील पाच खंडांमधील शाळांचा समूह आहे. राउंड स्क्वेअर हे व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्य विकासासोबतच अकादमी प्रतिभेसाठीही कार्य करते. ही युनायटेड किंगडमची नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे. जगभरातील शंभराहून अधिक शाळा तिच्या सदस्या आहेत. दक्षिण-उत्तर आशिया आणि सौदी विभागाकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यापुढील कार्यक्रम
१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता लेखिका सागरिका घोष यांच्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर विद्यार्थी सामाजिक कार्य करतील. संध्याकाळी ५ वाजता महात्रया रा हे विद्यार्थ्यांना संबोधित करतील. ३ ऑक्टोबरला ग्रीसचे राजा काँस्टेन्टाइन यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. ४ ऑक्टोबरला सर्व शिष्टमंडळे आपापल्या मायदेशी रवाना होतील.