आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'दुनियादारी\'ने रचला मराठी सिनेइतिहासात नवा विक्रम, संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून 710 शो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दुनियादारी' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. 19 जुलै रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाचा हा तिसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात 'दुनियादारी'ने संपूर्ण महाराष्ट्रात 270 चित्रपटगृह आणि दिवसाला 710 शोची बाजी मारली आहे.

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात 'माहेरची साडी', 'दे धक्का', 'गल्लीत गोंधत दिल्लीत मुजरा' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सर्वात सुपरडूपर हिट सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. मात्र त्यांचेही विक्रम तोडत 'दुनियादारी'ने यशाचा विक्रम रचला आहे. 'गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सिनेमांचे दुस-या आठवड्यात 156 चित्रपटगृहे आणि अनुक्रमे 410 आणि 400 शोचा विक्रम तोडत मराठीत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

पहिल्या आठवड्यात 140 चित्रपटगृहे आणि दररोज 200 शोने सुरु झालेल्या 'दुनियादारी'च्या प्रवासाने दुस-याच आठवड्यात 208 चित्रपटगृहे आणि सव्वा चारशे शो अशी घोडदौड केली होती. सर्वच रसिकांनी 'दुनियादारी'ला जबरदस्त प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 100 टक्के हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले. आता तिस-या आठवड्यात चित्रपटगृहांची संख्या दुपटीवर गेली असून दिवसागणिक शोदेखिल दुप्पट झाले आहेत.

मुंबईत 110 चित्रपटगृहांमध्ये दिवसाचे 300 शो, पुण्यात 51 चित्रपटगृहांमध्ये 291 शो, नाशिकमध्ये 70 चित्रपटगृहांमध्ये 162 शो, मराठवाडामध्ये 70 शो आणि नागपूरमध्ये 51 शो अशी 'दुनियादारी'ची घोडदौड सुरु आहे.

महाराष्ट्राबरोबरच झी टॉकीजने हा सिनेमा गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यातही प्रदर्शित केला आहे. गोवा आणि कर्नाटकमध्ये दिवसाला आठ शोमध्ये 'दुनियादारी' गर्दी खेचतोय.

मराठी सिनेमा तरुणाईला आपल्याकडे वळवण्यात अपयशी ठरतो, मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमांकडे पाठ फिरवतात अशी खंत नेहमीच व्यक्त केली जात होती. मात्र 'दुनियादारी' सिनेमाने ही प्रतिमा पुसून काढली आहे. सत्तरच्या दशकात तरुणाईच्या मनावर आपला खास ठसा उमटवणा-या सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' कादंबरीवर आधारित सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. रिलीजपासूनच या सिनेमाला हाऊसफूलचे बोर्ड लागले आहेत. रिलीजच्या केवळ बारा दिवसांतच या सिनेमाने तिकिट बारीवर पाच कोटींवर व्यवसाय केला आहे.

झी टॉकीजची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची नोंद 'टॉप 10 मुव्हीज इन इंडिया इन करंट वीक'च्या यादीत झाली आहे. या यादीत हा सिनेमा पहिल्या स्थानावर आहे.

काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी तरुणाईची दुनियादारी तीच आहे. आपल्या मैत्रीसाठी जीवाचं रान करणारे जिगरी दोस्त... कट्यावरची धमाल, टपरीवरची कटींग, कॉलेजमधले मंतरलेले दिवस आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावरही कालातीत टिकून राहिलेली मैत्री.. या सगळ्याचा जिवंत अनुभव घेऊन अवतरलेली ही सदाबहार 'दुनियादारी' प्रेक्षकांनी आपली केली. प्रत्येक पिढीतील तरुणांना वेड लावणारी ही 'दुनियादारी' त्याच दशकातील लुकसह, रेट्रो स्टाईलमध्ये रुपेरी पडद्यावर अवतरली. त्यामुळे तरुणांनीच नव्हे तर सर्व वयोगटातल्या तमाम रसिकांनी या सिनेमाला आपली खास पसंती दर्शवली आहे.

प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल काय म्हणतायेत 'दुनियादारी'चे कलाकार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...