आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पुरस्कारांतही 'फॅंड्री'ची बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थपूर्ण सामाजिक विषय, उत्तम पटकथा, कलाकारांचा ताकदीचा अभिनय, कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, अप्रतिम छायांकन अशा सर्वच पातळ्यांवर प्रभावी ठरलेला, प्रेक्षक-समीक्षकांकडून गौरविला गेलेला, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली ठसठशीत मोहर उमटवणा-या 'फॅंड्री'ने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत 61 व्या राष्ट्रीय पुरस्कारातही बाजी मारली आहे. 'फॅंड्री'मध्ये जब्याची मुख्य भूमिका करणा-या सोमनाथ अवघडेला उत्कृष्ट बालकलाकार आणि नागराज मंजुळे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) या दोन विभागात पुरस्कार पटकावत 'फॅंड्री'ने हा बहुमान मिळवला आहे.
नागराज मंजुळे यांची कथा-पटकथा- दिग्दर्शन असलेला 'फॅंड्री' हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. आजवर नटरंग, काकस्पर्श, दुनियादारी, टाइमपास असे एक ना अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनने 'फॅंड्री' प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. समीक्षकांना भावलेले चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरत नाहीत हा आजवरचा समज 'फॅंड्री'ने मोडीत काढत तब्बल 7 कोटींची कमाई केली. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांसोबतच सोशल नेटवर्क आणि सोशल अॅप्समधूनही 'फॅंड्री'ची खूप चर्चाही झाली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतानी म्हणजे नसिरूद्दीन शहा, राकेश ओमप्रकाश मेहरा, अतुल कुलकर्णी, आणि आमिर खान हेही 'फॅंड्री' बघून प्रभावित झाले होते. आमिरने तर त्याच्या ट्विटरवरून 'फॅंड्री'बद्दल ट्विट केलं होतं आणि त्याचा ट्रेलरही शेअर केला होता. सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही 'फॅंड्री'ला असाच भरभरून प्रतिसाद मिळाला होता. नुकताच 'फॅंड्री'ने आपला गौरवशाली 50 वा दिवस साजरा केला होता. शिवाय अमेरिकेत संपन्न झालेल्या चित्रपट महोत्सवातही सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा मान मिळवला होता. पुरस्कारांचा हा ओघ सुरू असतानाच बुधवारी जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामध्येही 'फॅंड्री'ने दोन पुरस्कार पटकावले.
या यशाबद्दल या यशाबद्दल नागराज मंजुळे म्हणाले, ''राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होतोय. विशेष आनंद याचा आहे की हा पुरस्कार सोमनाथला मिळाला. सर्व टीमचं अभिनंदन.''
एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, “आजवर फॅंड्रीने विविध चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. पण राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान हा निश्चितच यात सर्वात मोठा आहे. हा मराठी चित्रपटाचा, मराठी भाषेचा गौरव आहे. याशिवाय नागराज आणि त्याच्या टीमने, निर्माते निलेश नवलाखा (नवलाखा आर्ट्स) आणि विवेक कजारिया (होली बेसिल प्रोडक्शन्स) या सर्वांनी केलेल्या मेहनतीचं हे चीज आहे. सोमनाथ सारख्या चित्रपट क्षेत्राची पार्श्वभूमी नसलेल्या मुलावर नागराजने विश्वास टाकला आणि तो त्याने सार्थ करून दाखवला हे आजच्या पुरस्काराने सिद्ध झालंय. यासोबतच इतर विभागातील पुरस्कारांमध्येही मराठी चित्रपटांनी आपली मोहर उमटवली आहे. मराठी चित्रपटांची ही घोडदौड सर्वांचा आत्मविश्वास भक्कम करणारी आहे”.