आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया पाठारे-भालचंद्र कदम ठरले \'फू बाई फू\'चे महाविजेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कॉमेडीचा झणझणीत तडका अर्थात झी मराठीवरील 'फ्रूटी प्रस्ततू फू बाई फू कॉमेडीचे आधारकार्ड' या दणकेबाज पर्वाची महाअंतिम फेरी नुकतीच पार पडली. या पर्वाच्या विजेतेपदावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली ती सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम यांनी. ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही महाअंतिम फेरी रंगली.

कुशल बद्रिके-हेमांगी कवी, विजय पटवर्धन-क्षिती जोग, हृषिकेश जोशी-लीना भागवत, प्रियदर्शन जाधव-हेमंत ढोमे यांच्यासह सुप्रिया पाठारे आणि भालचंद्र उर्फ भाऊ कदम या पाच जोड्यांमध्ये महाअंतिम फेरी रंगली. या सगळ्यांमध्ये बाजी मारली ती सुप्रिया आणि भालचंद्र कदम यांनी.

सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते महाविजेत्या जोडीला गौरवण्यात आले. या महाअंतिम फेरीत हास्याचे चौकार आणि षटकार रसिकानी अनुभवले आणि हास्याच्या दणदणाटात आणि टाळ्यांच्या गजरात कॉमेडीचा जल्लोष साजरा झाला.

अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणा-या फू बाई फूचे हे सहावे पर्व मनोरंजनाचा जबरदस्त धमाका म्हणून गाजले. कॉमेडीच्या आधारकार्डाने हे पर्व झळाळले. अश्विनी काळसेकर आणि स्वप्नील जोशींची उत्स्फूर्त दाद आणि रसिकांच्या हशा, टाळ्या, शिट्टयांच्या गजरात कॉमेडीचा हा जलसा उत्तरोत्तर रंगत गेला.

या महाअंतिम फेरीला 'दुनियादारी' या आगामी सिनेमातील कलाकार सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, उर्मिला कानेटकर, सुशांत शेलार यांनी हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. 'दुनियादारी' सिनेमाच्या टीमबरोबरच 'नांदी' या नाटकातील अविनाश नारकर, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, स्पृहा जोशी यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीत मान्यवर मंडळीसुद्धा यावेळी हजर होती.