आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulzar Selected For Dadasaheb Phalke Award News In Divya Marathi

नशिल्या शब्दांचा कविराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 फेब्रुवारी 2007. नांदेडचा कार्यक्रम आटोपून कविराज गुलजार औरंगाबादला आले. साडेचार वाजेचे विमान गाठण्यासाठी ते दुपारी दोन वाजताच विमानतळावर आले. त्यांचा नांदेडपासूनचा प्रवास ट्रॅक करीत होतो, अखेर ते कारमधून उतरताच त्यांना गाठले. शुभ्र कपड्यांतील तो राजहंसासारखा देखणा माणूस मोठा निर्मळ हसला आणि संवाद चांगला होणार हे नक्की झाले. विमानतळाच्या वेटिंग लाऊंजमध्ये कडक, कम शक्कर चहाचे घोट घेत त्यांनी मुलाखत देणार नाही. फक्त गप्पा मारूया, असे सांगत गप्पा सुरू झाल्या.

कुसुमाग्रज, गालिब, पंजाबी खाना, जगजित, बाळासाहेब ठाकरे, दैनिकांतील साहित्य, औरंगाबादचे म्हणजे वली औरंगाबादी असे काय काय विषय या माणसाला माहिती. गुलजारचा चाहता म्हणूनच त्या भेटीचा आनंद लुटत राहिलो. मध्येच विमानतळावरचा कुणी हिंदी भाषिक अधिकारी गुलजारसाहेबांची स्वाक्षरी घ्यायला आला. काही तरी लिहून द्या, असा पे्रमळ लकडा त्याने लावला. त्याच्याकडे आपल्या तपकिरी डोळ्यांतून मिश्कीलपणे पाहात गुलजारजींनी उर्दूतून दोन ओळी लिहिल्या आणि उर्दूतूनच लफ्फेदार सही केली. तो अधिकारी म्हणाला, सर मुझे तो उर्दू नही आती. गुलजारजी म्हणाले, भाई मेरे, गुलजार की लाइनें चाहते हो तो उर्दू भी सीख लो. सिर्फ आपके लिए लिखा है ! गुलजार कधी आवडायला लागतो ते कुणीच सांगू शकत नाही. बस्स, कधी तरी, कुठल्या गाफील क्षणी त्याच्या शब्दांच्या आणि त्यातील खोलवर झिरपणार्‍या अर्थाचे शिंपण करतो आणि आपण आपोआपच गुलजारचे होऊन जातो. मग गुलजार नेमका आहे तरी कसा याचा शोध घेण्यात वर्षानुवर्षे जातात आणि प्रत्येक वळणावर चकित करणारा गुलजार आपल्याला त्याच्या कह्यातून बाहेर पडूच देत नाही. मग हा माणूस गझल लिहितो तेव्हाही आवडून जातो, नज्म लिहितो तेव्हाही भावतो आणि चक्क कजरारे, बीडी जलाइले लिहितो तेव्हाही आवडून जातो. कधी तो सुना है सरहद के उस पार कल रात चली थी गोली म्हणत त्याच्या पंजाबच्या रक्तबंबाळ जखमांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न करतो किंवा मग तुम्ही से जन्मू तो शायद मुझे पनाह मिले असे सांगत प्रेमातील अतीव टोकाची भावना व्यक्त करून जातो. प्रतिमांचा अचंबित करणारा वापर हे गुलजारजींचे वैशिष्ट्य.

मग ते ‘जिनके सर हो इश्क की छाँव पाँव के निचे जन्नत होगी’ असेल किंवा ‘काँच के ख्वाब है बिखरे हुए तन्हाई में, ख्वाब टूटे न कोई जाग न जाए देखो’ असो. त्यांच्या कविता, नज्म, गझलांमधील या प्रतिमा त्यातील विचाराइतक्याच सुस्पष्ट असतात हे गुलजार वाचायला, ऐकायला लागल्यावर पटत जाते. आबेदा परवीनसोबत त्यांनी कबीर हा अल्बम केला. त्यात आबेदा यांचे कौतुक करताना ते म्हणतात, ‘दोहरे नशे अच्छे नही होते. एक कबीर का नशा दुसरा आबेदा की गायकी का..’ तसाच नशा गुलजारजींच्या शब्दांनी त्यांच्या चाहत्यांना कायम दिलाय. या माणसाला कधी तरी भेटायचे अशी अतीव इच्छा एका अनाहूत क्षणी पूर्ण झाली आणि एक जिती जागती नज्म बघायला मिळाली. कारण त्यांनीच म्हटल्यासारखे, ‘नज्मों के लिफाफों में कुछ मेरे तजुर्बे है, कुछ मेरी दुआएं है’