आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gulzar Selected For Dadasaheb Phalke Award News In Divya Marathi

बस तेरा नाम ही मुकम्मिल है..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मैं रोजगार के सिलसिले में कभी कभी
उसके शहर जाता हूं,
तो गुजरता हूं उस गली से...'

कवी गुलजार यांच्या या कवितेच्या ओळींप्रमाणेच एक कवी म्हणून, एक सिनेकलाकार म्हणून या सिनेमा व कविता नावाच्या भव्य शहरात फिरताना माझी गुलजार यांच्याशी भेट झाली होती. एरवी त्यांना शब्दांतून वाचायचो त्या वेळी शब्दांमधला, दोन ओळींमधला भावार्थ, त्यांच्या कवितेतली लय, नाद यांच्याशी एक आंतरिक नातं निर्माण झालं होतं. ही भेट वास्तवात झाल्यानंतरही त्यांचं जगणंच जणू कविता असावं, नव्हे कविताच आहे इतकी त्यांच्यातली प्रतिभा त्यांच्या देहबोलीत, वागण्यात भिनलेलीय हे मला सतत जाणवत आलं आहे.

कविता भूतकाळातल्या जुनाट शैलीमध्ये, त्याच त्या शब्दांमध्ये घुटमळत राहिली की ती केवळ पाठय़पुस्तकात नेमलेल्या कवितेसारखी होते. ती प्रवाही पाण्यासारखी पसरत नाही. म्हणूनच भल्या भल्या कवींच्या कविता नव्या पिढीच्या दृष्टीनं कालबाह्य झाल्या आहेत. कवितेचा हा काळानुसार होत गेलेला संकोच गुलजार यांनी मात्र कधीच होऊ दिला नाही. काळाबरोबर बदलत गेलेला हा कवी आहे. आज गुलजार यांचं वय 79 वर्षे आहे. त्यांच्या कविता व गीते प्रकाशात यायला सुरुवात झाली तो काळ आणि आताचा काळ यात महदंतर आहे. ते केवळ काळाचं नाही की वेळेचं नाही, तर बदलत गेलेल्या विचारांचं, आवडीनिवडींचं, भावण्याच्या तीव्रतेचं आहे. हा बदल सुज्ञपणे ओळखून, समजून घेऊन त्याला केवळ उसनेपणाने न स्वीकारता, स्वत:च्या आंतरऊर्मीला धक्का न पोहोचू देता बदलानुसार लिहिणारा गुलजार हा एकमेव कवी आहे. एकेकाळी ‘मोरा गोरा अंग लै ले’ लिहिणारे गुलजार मागच्या पिढीला जितके आपलेसे वाटतात, तितकेच ‘ओमकारा’ चित्रपटातील ‘बीडी जलाइले जिगर से पिया’ हे गाणे लिहिणारे गुलजार नव्या पिढीलाही चटकन आपलेसे करणारे ठरतात.

ते केवळ शरीराने काळाशी जुळते घेणारे ठरले नाहीत तर त्यांनी मनाने काळानुसार होत जाणार्‍या स्थित्यंतरांना आपलेसे केले. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..’ हे ‘इजाजत’मधील गाणे आठवल्यावाचून राहत नाही. गाण्यामध्ये त्या त्या प्रसंगाला उभे करताना ते केवळ उडत्या शब्दांमध्ये व्यक्त होऊ द्यायचे नाही, त्या गाण्याला वेगळा पॅच म्हणून घडवायचे, नाही तर त्या प्रसंगाचा, त्या चित्रपटाचा अविभाज्य भाग म्हणून ते गाणे घडवायचे ही गुलजार यांची शैली त्या गाण्याला जिवंतपणा प्राप्त करून द्यायची, अजूनही देत आहे. इथवर गुलजार यांच्या गीतांचे मूल्यांकन थांबू शकत नाही. त्यांच्या गीतांमधला पलीकडचा अवकाश ते गीत स्वतंत्र ऐकतानाही केवळ जाणवत राहतो, तो पकडता येत नाही ही हुरहूर ते गीत सतत ऐकावेसे वाटते असे यश देणारी आहे.

गीतांमध्ये कविता आणि कवितेत गीत अशी सहज अभिव्यक्ती फार थोड्या कवींना जमते. गुलजार त्यापैकी एक आहेत. ‘देख ना मेरे सर से ये जमीं बह रही है..’ हे ‘बंटी और बबली’मधील गाणे कविता म्हणून ऐकल्यास ती कविता वाटते, तर ‘नज्म का एक टुकडा दिनभर मेरी सांस में सरकता रहा’ यासारख्या कवितेच्या ओळींमधून गीताची लागणारी चाहूल एक वेगळाच प्रतिभास्पर्श देऊन जाते. त्यांच्याबरोबर कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी अनुवाद व मराठी सादरीकरणाचा कार्यक्रम करीत असताना त्यांच्या या सहजशैलीची मला कित्येकदा प्रचिती आली होती. ‘दर्शन करायला आला आहात, या..’ ही कवी कुसुमाग्रजांची ‘गाभारा’ या कवितेतील ओळ गुलजार ‘गर्भगृह’ या अनुवादित कवितेत ‘दर्शन करने आये हो, आइये’ अशी अनुवादित करतात व त्यांच्या खास लहेजामध्ये ज्या वेळी सादर करतात तेव्हा दोन थोर कवींच्या भावाभिव्यक्तीचा एक सुरेख अनुभव येतो, ज्यातून वारंवार मी पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला आहे. त्यांच्या कवितेत, गीतांमध्ये साहिर लुधियानवी, शैलेंद्र, मजरुह सुलतानपुरी यांच्यासारखी सहजता मला जाणवत आली आहे. त्यांच्या गीतांना नव्या पिढीचा ठेका जरी असला तरी तो उथळ नाही, साहिरची भावगर्भ शैली त्यात आहे, गीत असूनही शैलेंद्र यांच्या कवितेतली लय त्यात आहे, सुलतानपुरी यांच्यासारखा नाद त्यात आहे. म्हणूनच त्यांच्या अलीकडच्या चित्रपटांमधील गाण्यांचाही वेगळेपणा इतर गाण्यांपेक्षा सहज उठून दिसत आला आहे. शिवाय त्यांच्या गीतांनाही साहित्यिक मूल्य आहे ते त्यांच्या गीतांमधल्या अर्थपूर्णतेमुळेच.

त्यांच्या सिनेमाचंही तसंच. त्यांचा सिनेमा पाहताना तो केवळ सिनेमा उरत नाही तर तो पूर्णत: एक कविता असल्याचा एक प्रत्यय प्रेक्षकास येतो. ऑँधी, अंगूर, कोशिश, नमकीन यांसारख्या त्यांच्या चित्रपटांच्या स्मृतींना उजाळा दिल्यास या प्रत्ययाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. त्यांची ‘बोस्की की कविता’ असो, ‘रात पश्मीने की’सारखा कवितासंग्रह असो वा धुवां, रावीपारसारखे लघुकथासंग्रह असोत वा त्यांचे सिनेमे असोत, एक कवी आणि गीतकार म्हणून दृश्यात्मक अभिव्यक्तीची त्यांना जी सर्मथ देण लाभली आहे, ती त्यांच्या या सगळ्या कलांमधून, साहित्यामधून मला जाणवत आली आहे. त्यांना वयाच्या 79व्या वर्षी सरकारचा दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार मिळणं हा त्यांच्यातल्या या दिवसेंदिवस चिरतरुण होत जाणार्‍या प्रतिभेचा सन्मान आहे.
शब्दांकन : प्रियांका डहाळे