मुंबई - अभिनेता विंदू दारा सिंग आज (6 मे) आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. 6 मे 1964 रोजी मुंबईत विंदूचा जन्म झाला. टीव्ही जगतात तो हनूमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे. दिवंगत अभिनेते आणि पहलवान दारा सिंग यांचा विंदू मुलगा आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांत काम करणारा विंदू आपल्या वडिलांप्रमाणे यश मिळवू शकला नाही.
विंदूचे करिअर-
विंदूने मोठ्या पडद्यावर 'करन' (1994) या सिनेमाद्वारे एन्ट्री घेतली. मात्र त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर तो आपल्या वडिलांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'रब दिया राखां' (1996) या सिनेमात झळकला. 'गर्व', 'मैंने प्यार क्यों किया', 'पार्टनर', 'हाउसफूल' या सिनेमात त्याने काम केले आहे. सहायक अभिनेत्याच्या रुपात विंदू मोठ्या पडद्यावर झळकतो.
छोट्या पडद्यावर हनूमानाच्या नावाने प्रसिद्ध-
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विंदूनेही टीव्ही मालिकेत हनूमानाचे पात्र साकारले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'जय वीर हनूमान' या मालिकेत त्याने ही भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त मिसेस कौशिक की 'पाच बहुएं', 'श्श्श्श कोई है', 'कर्मा' आणि 'ब्लॅक' या मालिकांमध्ये काम केले आहे.'मां एक्सचेंज', 'वेलकम: बाजी मेहमान नवाजी' की आणि 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही त्याचे दर्शन घडले. 2009 मध्ये विंदू 'बिग बॉस'च्या तिस-या पर्वाचा विजेता ठरला होता.
विंदू आणि विवाद-
विंदूने आपल्या खासगी आयुष्य आणि करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. वादातही तो अडकला आहे. बिग बॉसच्या शोदरम्यान शर्लिन चोप्रा आणि बख्तियार इरानी यांच्यासोबत झालेल्या भांडणामुळे तो चर्चेत आला होता. याशिवाय 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये बुकीजसोबत नाव जोडल्यामुळे विंदूला अटक करण्यात आली होती.
विंदूचे लग्न-
विंदूचे लग्न अभिनेत्री फराह नाजसोबत झाले होते. मात्र काही दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगासुद्धा असून त्याचे नाव फतेह रंधावा आहे. फराहपासून विभक्त झाल्यानंतर विंदूने मॉडेल डीना उमारोवासोबत लग्न केले असून तो आनंदी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पत्नी डीनासोबतची विंदूची खास छायाचित्रे...