आठ वर्षांपूर्वी मराठी रंगमंचावर दाखल झालेलं आणि सुपरहिट ठरलेलं नाटक म्हणजे 'सही रे सही'. या नाटकात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेता भरत जाधव आणि लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या नाटकाद्वारे अवघ्या महाराष्ट्रातील नाट्यरसिकांवर मोहिनी घातली. या नाटकाने अडीच हजार प्रयोगांचा टप्पादेखील पार केला. आता हे सुपरहिट ठरलेलं नाटक लवकरच हिंदी रंगभूमीवर दाखल होणार आहे. 'राजू राजा राम और मैं..' या नावाने हे नाटक हिंदीत नाट्यप्रेमींच्या भेटीला येत आहे.
'सही रे सही'मध्ये भरत जाधव साकारत असलेली प्रमुख भूमिका बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी साकारत आहे. विशेष म्हणजे हिंदीतदेखील हे नाटक केदार शिंदेच दिग्दर्शित करत आहेत. याची माहिती स्वतः भरत जाधव यांनी
फेसबुकवरुन आपल्या चाहत्यांना दिली. "हिंदी सही रे सहीमध्ये प्रमुख भूमिकेत शर्मन जोशी असणार आहे. मराठीत मी आहेच की....!!!" असे भरत जाधव यांनी फेसबुकवर पोस्ट केले.
विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने शर्मन जोशी तब्बल दहा वर्षांनी रंगभूमीवर परत येतोय, शिवाय या नाटकाद्वारे तो नाट्य निर्मितीतदेखील पदार्पण करत आहे.
सध्या या नाटकाची रिहर्सल जोरात सुरु आहे. केदार शिंदे, शर्मन जोशी आणि नाटकाची संपूर्ण टीम यासाठी खूप मेहनत घेत आहे. या नाटकाचं हिंदी रूपांतरण आणि गीत लेखन ओंकार मंगेश यांनी केलं आहे. तर पंकज पडघम हे या नाटकाचे संगीतकार आहेत. अलीकडेच गायक मंगेश बोरगावकर याने या नाटकातील एक रॉकिंग गाणे स्वरबद्ध केले आहे.
नाट्यप्रेमींनी 'सही रे सही' या नाटकाला भरभरून प्रेम दिले आहे. हेच प्रेम आता केदार शिंदे आणि शर्मन जोशी यांच्या 'राजू राजा राम और मैं..' या नाटकाला मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
'राजू राजा राम और मैं..' या नाटकाच्या तालमीची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा ही खास झलक...