आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindi Dramatic Mohan Rakesh's Drama Ashad Ka Ek Din Now In Marathi

हिंदी नाटककार मोहन राकेश यांचे नाटक ‘आषाढ का एक दिन’मराठीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मोहमयी आणि त्यागमयी, ऐहिकता आणि कलात्मकता या द्वंद्वाविषयी आणि त्यांना बिलगलेल्या मानवी नातेसंबंधांविषयी कालातीत भाष्य करणारे ‘आषाढ का एक दिन’ हे ज्येष्ठ हिंदी नाटककार मोहन राकेश यांचे नाटक आता मराठी रंगभूमी गाजवण्यास सिद्ध झाले आहे. अतुल पेठे यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.


मूळ हिंदी नाटकाचे मराठी रूपांतर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मूळ हिंदी नाटक वाचले तेव्हाच विलक्षण आवडले होते. त्यातूनच मराठीतला अनुवाद ब-याच वर्षांपूर्वी केला होता.
पेठे म्हणाले, मोहन राकेश यांचे हे रचित नाटक असून, तिस-या शतकातील कालखंडात घडते. महाकवी कालिदास आणि त्याची कथित प्रेयसी मल्लिका यांची ही प्रेमकहाणी असली तरी त्याला अनेक अर्थवलये वेढून आहेत. मानवी नातेसंबंधांचे अर्थ काय असतात, ऐहिकता आणि कलात्मकता यांच्यातील सनातन जगण्याचे आयाम कोणते आणि मोहमयी तसेच त्यागमयी जगातील संघर्ष, अशा तीन स्तरांवर हे नाटक प्रवास करत राहते. हे कालातीत प्रश्न आहेत. अगदी नव्या, ताज्या दमाच्या पण गुणी कलाकारांकडून हे 1958 मध्ये लिहिलेले नाटक बसवताना आलेले अनुभव विलक्षण होते. मराठी रंगभूमीच्या आशयाला एका नव्या परिप्रेक्ष्यातून भिडण्याचा हा प्रयत्न आहे.


मूळ नाटक हिंदी भाषेत
० मराठी अनुवाद - ज्योती सुभाष
० मूळ नाटकानुसार तीन अंकांचे सादरीकरण
० ध्रुपदगायक पं. उदय भवाळकर आणि ज्येष्ठ वीणावादक पं. नारायण मणी यांचा सहभाग
० नेहरू सेंटर, एनसीपीएच्या महोत्सवात सादर
० निर्मिती सिद्धिविनायक संस्था - शेखर लोहकरे यांची
० राज्यभरात सर्वत्र प्रयोग करणार


टीमने गायिलेला हा विलंबित ख्याल
मला हे नाटक आजचे वाटते. त्यातील प्रश्न आजही औचित्याचेच आहेत. म्हणजेच चांगल्या साहित्याला काळाच्या, प्रांताच्या, भाषेच्या मर्यादा नसतात. ते फक्त माणूसपणाविषयी बोलते. आषाढातील एक दिवस याला अपवाद नाही, म्हणूनच ते करावेसे वाटले.
अतुल पेठे, दिग्दर्शक