आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणगावातील होळीच्या आठवणी आजही ताज्या !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरणगावातील होळीच्या आठवणी आजही ताज्या !
होळी रे होळी पुरणाची पोळी, साहेबाच्या ७७७७ बंदुकीची गोळी- अशा घोषणा देण्यासाठी उत्सुक व्हायचो अगदी आठवडाभर. जणू काही तालीम म्हटली तरी चालेल.
45 वर्षे मागे जाताना पुन्हा एकदा ती धम्माल आणि मज्जा आठवते अन् लहान होऊन जातो. दक्षिण मुंबईत म्हणजे लोअर परळ, करी रोड आणि चिंचपोकळी ही आगगाडीची स्थानके. लोअर परळच्या पुलावरून खाली उतरताना उजव्या हाताला लागायची ती बिनचिमणीची मिल. आमच्या गल्लीला लागून पोदार मिल. मग सीताराम मिल आणि चिंचपोकळीच्या पुलासमोर अपोलो मिल.
अशा या गिरणगावात 30 वर्षे राहिलो. होळीचे वेध लागायचे ते 15 दिवस आधीपासून. गल्लीच्या टोकाला मोकळी जागा होती. दोन चाळींच्या मधलं भव्य पटांगण. चुन्याची भुकटी ओली करून त्यात काथ्या भिजवायचा. मग चौकोन आखायचे. आट्यापाट्या खेळण्यासाठी. कसरत करून कुणीही बाद न होता शेवटचा चौकोन पार पडला की जिंकले. असा हा धम्माल खेळ म्हणजे आट्यापाट्या. धावून धावून कपडे भिजायचे, पण त्याच वेळी दोन्ही इमारतीत आपापल्या वयाच्या देखण्या मुली पाहत आहेत ना, याचीही खात्री करून घ्यायची. 2-3 तास कधी निघून जायचे, कळायचे नाही.
मग होळीची वर्गणी काढायचे निमित्त, पण आवडणा-या मुलीच्या घरापर्यंत जायला मोकळीक होती. झाडाचा ब-यापैकी जाड बुंधा, गवत, गोव-या हातगाडीवरून आदल्या दिवशी गल्लीत आणल्या जायच्या. दोन फुटांच्या खड्ड्याभोवती छोटंसं वर्तुळाकार विटांचं कुंपण तयार व्हायचं. खड्ड्यामध्ये झाडाचा बुंधा बसवायचा. त्याच्या आजूबाजूला गोव-या लावायच्या आणि होलिकामातेची प्रतिष्ठापना करायची. पताका, झिरमाळ्याची सजावट असायची.सायंकाळी सहा साडेसहाला 5 इमारतींमधील वडीलधारी माणसे गोळा झाली की यथासांग पूजा व्हायची आणि समोरच्या मांडलेल्या आराशीला एका जळक्या फळकुटाने अग्नी दिला की बोंबाबोंब सुरू व्हायची. ख-या अर्थाने बोंबाबोंब. वर्षभरातील कुणावर असलेला राग, लोभ, मत्सर बोंब मारून व्यक्त करायचा.सकाळपासून घरातील धावपळ म्हणजे पुरण बनवणे. माझी आई कोकणातील. त्यामुळे मऊसूत पुरणाची पोळी, ओला नारळ खोवून पाट्यावर वाटून त्याचे दूध काढायचे. त्यात वेलचीची पूड आणि पुरणाच्या पोळीत बारीक किसलेले जायफळ, नारळाच्या दुधातून पुरणपोळी बुडवून खाताना स्वर्गसुख लाभायचे. आईला जाऊन 12 वर्षे झाली अन् ती पुरणपोळी जी सुटली ती आजपर्यंत.
मोठ्या माणसांच्या आट्यापाट्या जोरात असायच्या. पेंगुळल्यावर घरी जायचो. कारण दुस-या दिवशीचा मुख्य कार्यक्रम रंगपंचमी.
समवयस्क पोरे एकत्र जमून प्रत्येकाच्या दारात उभे राहायचो आणि मग...
आयना का बायना, घेतल्याशिवाय राह्यना
पेटी को चाबी लगती है, हमको पैसा मिलता है
चोर चोर कामाटी । उंदराने नेली लंगोटी
उंदराची आय। बारा म्हैने कवटा खाय
असं पूर्ण गाणं म्हटलं की आम्हा पोरांना होळीचा पोस्त मिळायचा. 5 ते 10 पैसे. अगदीच 25 पैसे, 50 पैसे मिळायचे, पण क्वचित. मग सगळ्या इमारती फिरून गोळा झालेला पोस्त. त्या पैशात भेळ आणि आइस्फ्रूट मेजवानी. मग एकमेकांना भिजवत, गुलाल टाकत दुपारपर्यंत भटकायचो तेही गल्लीतच. पण एक मात्र त्या वेळी पथ्य पाळले जायचे, ते म्हणजे रासायनिक रंगांचा वापर नसायचा. चिंब ओले होऊन लाल रंगात भडक झालेले सगळेच जण एकमेकांना विचारायचे, ए तू कोण? तुझं नाव काय? आज ती गंमत राहिली नाही. आता फुगे मारले जातात, तेही स्त्रियांवर, रासायनिक, हानिकारक करणारे रंग वापरले जातात. याला होळी म्हणायचे का?