मुंबई - चित्रपट अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची विभक्त पत्नी सुझान यांचा चौदा वर्षांचा संसार अखेर मोडला. या दोघांनीही वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. शनिवारी मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.
तब्बल चौदा वर्षे संसार केल्यानंतर या जोडप्याने १४ डिसेंबर २०१३ रोजी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.या दोघांनी सहमतीच्या घटस्फोटासाठी नेमके कोणते कारण दिले, हे मात्र लगेच कळू शकले नाही. हृतिक आणि सुझानला ऱ्हिदान व रेहान ही दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांची एकत्रित कस्टडी घेण्याचे दोघांनीही मान्य केले आहे.
दोघांचेही जुगाड : हृतिक हा दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आहे.त्याचे अभिनेत्री बार्बरा मोरी हिच्याशी गुटर्गू असल्याची चर्चा होती. सुझान दिग्दर्शक संजय खान यांची कन्या आहे.अभिनेता अर्जुन रामपालसोबत तिचे नाव जोडले जात आहे .
बालपणीचे प्रेम : हृतिक आणि सुझान हे बालपणीचे मित्र होते. चार वर्षे त्यांचे प्रेमकरण चालले.त्यानंतर २००० मध्ये दोघे
विवाहबद्ध झाले होते. याच वर्षी हृतिकचे ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे धमाकेदार पदार्पण केले होते.
हृतिकच्या विरहयातना : ‘हे प्रेमासाठी माझे मोठे बलिदान आहे. सुझान हेच माझे प्रेम आहे आणि माझ्या उर्वरित जीवनातही नेहमीसाठी तीच माझे प्रेम राहील. माझ्याशिवाय तिचे हास्य आणखी फुलणार असेल तर तिच्यावरील प्रेमापोटी तेही स्वीकारण्यास मी तयार आहे, असे हृतिकने विभक्त होण्याच्या निर्णयानंतर म्हटले होते.
४०० कोटी रुपये पोटगीच्या अफवाच..! घटस्फोटानंतर सुझानने हृतिककडे ४०० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचीही चर्चा होती मात्र त्यात तथ्य नसल्याचे या दोघांनीही नंतर स्पष्ट केले होते.