आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या प्रामाणिकपणाला कामचुकार मुलांनी दिली ‘इक्कीस तोपों की सलामी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इक्कीस तोपों की सलामी’ आपल्या प्रामाणिक वडिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी निघालेल्या दोन कामचुकार मुलांची कथा आहे. हा चित्रपट वडील आणि मुलांनी एकत्र पाहावा, अशी इच्छा अनुपम खेर यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक मुद्दे आणि भ्रष्टाचार विनोदाबरोबरच व्यंगाच्या माध्यमातून सादर करणाऱ्या चित्रपटामध्ये नात्यांचे चित्रीकरण कमी असल्याचे दिसून येते. ‘इक्कीस तोपों की सलामी’मध्ये मात्र नात्यांना प्राधान्य देण्यात आले असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. अनुपम खेर यांनी प्रामाणिक वडिलांची भूमिका साकारली असून त्यांची मुले त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर तोफांची सलामी देतात. ऋषी चढ्ढा आणि दिव्येंदू शर्माने अनुपम खेर यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे.
चित्रपटातील बाप-लेकाच्या नात्याबद्दल अनुपम खेर यांनी सांगितले की, ‘या चित्रपटात आम्ही वडील आणि मुलांमध्ये वेगाने वाढत चाललेला दुरावा दाखवला आहे. वडील म्हातारे झाले, ओल्ड फॅशन्ड आहेत, असे मुलांना वाटते. शेवटी वडिलांनाच मुलांकडून सन्मान मिळवण्यासाठी मृत्यूला कवटाळावे लागते. मृत्यूनंतरच मुलांना आपल्या वडिलांचा त्याग कळतो. त्यावेळी ते आपल्या वडिलांना आपल्या हिश्शातील मिळालेला सन्मान मिळवून देण्यात कोणतीच कसर ठेवत नाहीत.’
कथेमध्ये सुरुवातीला बाप-लेकांमधील संबंध चांगले नसतात. आपली दोन्ही मुले बिनकामाची असल्याचे वडिलांचे म्हणणे असते. मुलेदेखील वडिलांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. ते इतरांशी कमी बोलतात आणि घरामध्ये स्वत:ला नेहमी कोंडून घेत असतात. मात्र, आपल्या वडिलांचा संघर्ष आणि प्रामाणिकपणामुळे दोन्ही मुलांची विचारधारा बदलते. आपल्या वडिलांच्या प्रामाणिकपणाला २१ तोफांची सलामी देण्यास निघालेल्या मुलांना आपल्या वडिलांचे जीवन केवळ आपले पालनपोषण करण्यासाठी संघर्ष करण्यात गेल्याचे कळते. आयुष्यात प्रामाणिकपणाने काम केल्यानंतरही आपल्या वडिलांना अनेकदा अपमान सहन करावा लागल्याने त्यांना हक्क मिळवून देण्याचा निश्चय मुले करतात.