आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचे निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - मराठी संगीत रंगभूमीवरील हरहुन्नरी व्यक्तीमत्व जयमाला शिलेदार यांचे आज (बुधवारी) रात्री 2 वाजता निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. जयमाला शिलेदार यांना गेल्या ब-याच दिवसांपासून किडनीच्या विकाराने ग्रासले होते. त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि पहाटे दोनच्या सुमारास जयमाला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ गायिका किर्ती शिलेदार, लता बहुले यांच्यासह पाच मुली आहे.

अभिनेते जयराम शिलेदार यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी 'मराठी रंगभूमी' या संस्थेची स्थापना केली. ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’ ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ यांसारख्या नाटकांची त्यांनी निर्मिती केली. संगीत नाटकांना पुर्नजीवन देण्याचे काम त्यांनी केले.

‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ ही जयमाला शिलेदार यांची गाजलेली नाटके आहेत. रंगभूमीवरील उत्तम कामगिरीबद्दल जयमाला शिलेदार तब्बल तीन वेळा बालगंधर्व पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. त्यांना 2006 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार आणि गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2003 मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाली होती. हे नाट्यसंमेलन अहमदनगर येथे भरवण्यात आले होते.

जयमाला शिलेदार यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रावर आणि संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.