फाईल फोटो: जिया खान
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई सेशन कोर्टाने खटल्याची सुनावणी 21 जुलैपर्यंत स्थगित केली आहे.या प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पंचोली मुख्य आरोपी आहे. सूरजने न्यायालयात स्वतः हजर न राहण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. सत्र न्यायाधीश ए.एस शिंदे यांनी या प्रकरणात सुनावणी स्थगित केली आहे. यात आपल्या मुलासोबत आलेल्या आदित्य पंचोली याने न्यायालयाच्या बाहेर उपस्थित पत्रकारांना सांगितले, की या प्रकरणात लवकरात लवकर एक एसआयटी तयार व्हायला पाहिजे.
काय होतं प्रकरण?
अमेरिकेची नागरिक असलेली बॉलिवूड अभिनेत्री जिया मागच्या वर्षी 3 जूनला आपल्या जुहू येथील घरात मृतावस्थेत आढळली होती. पोलिसांनी कथितरित्या जियाने लिहीलेल्या पत्रांचा आधार घेत 10 जूनला सूरजला अटक केली होती.
जियाची आई राबिया खान यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली आणि जियाचा मृत्यू हा खून असल्याचा दावा केला होता, तसेच सीबीआय चौकशीची मागणीदेखील केली होती. या प्रकरणात राबिया यांनी मुंबई येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील अधिकार्यांचीसुद्धा भेट घेतली. जुहू पोलिसांनी याचवर्षी 16 जानेवारीला 447 पानांची चार्जशीट न्यायालयासमोर प्रस्तूत केली होती.