आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन अब्राहम साकारणार फुटबॉल खेळाडूची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन अब्राहम आता फुटबॉलवर आधारित ‘1911’ या चित्रपटात काम करणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून शुजित सरकार त्याचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट ब्रिटिश काळातील एका कथेवर आधारित असून जॉनने आता या चित्रपटातून वैयक्तिक आयुष्यातील आपली फुटबॉलची आवड पुन्हा एकदा अजमावायचे ठरवले आहे. जॉन स्वत: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2014चा ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर आहे. शिवाय त्याने या आधी ‘गोल’ या फुटबॉलवरच आधारित चित्रपटातही काम केले होते.
मोहन बगन हा भारतीय खेळाडू त्याच्या टीमसह ब्रिटिश खेळाडूंविरोधात पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या परिस्थितीत फुटबॉलची मॅच खेळतो असा आशय या चित्रपटाचा आहे. 'गुलाब गॅँग' या चित्रपटाची कथा लिहिणारे सौमिक सेन यांनी हे फुटबॉलभोवती फिरणारे कथानक लिहिले असून जॉन त्यात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. आमीर खान अभिनित ‘लगान’च्या आशयाशी साधर्म्य असलेल्या या कथेतून फुटबॉलच्या माध्यमातून शुजित सरकार ब्रिटिश आणि भारतीयांचा संघर्ष दाखवणार आहेत. या चित्रपटाचे स्क्रिप्ट सरकार यांनी जॉनला जानेवारीदरम्यानच सोपवले होते. जॉन स्वत: फुटबॉल खेळण्याचा छंद जपणारा असल्याने त्याच्यासाठी हा चित्रपट एक खास भेटच ठरणार आहे.
मद्रास कॅफे, विकी डोनरसारख्या उत्तम आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती करणा-या जॉनचा सरकार यांच्याबरोबरचा अभिनेता म्हणून दुसरा तर निर्माता म्हणून तिसरा चित्रपट आहे. मद्रास कॅफेतील जॉनच्या भूमिकेचे समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. आता त्याला फुटबॉलपटू म्हणून प्रेक्षक व समीक्षक कशी दाद देतात यावर चित्रपटाचे यश अवलंबून आहे.