भीषण महापुराच्या संकटात सापडलेल्या जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणाबाहेर आहे. या भागातील लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आता बॉलीवूडमधील नवोदित अभिनेता वरुण धवन पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने किटो वेबसाइटवर
आपले पेज बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले आहे.
वरुणने आपल्या पेजवर लिहले की, ‘मी माझ्या पहिल्या सिनेमाचे शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये केली होती. सध्या तेथील लोकांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्याची आपणा सर्वांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे.’
या अभियानाच्या माध्यमातून जेवढी रक्कम जमा होईल, ती केअर इंडिया या एनजीओला देण्यात येणार आहे. या पैशामधून पूरग्रस्त भागामध्ये एका सर्व्हायव्हल किटचे (प्रतिकिट ५००० रुपये) वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये टारपुलिन, मॅट्स, हायजीन किट आणि ब्लँकेट्स असणार आहेत. सध्या वरुणने २० किटची रक्कम एनजीओला दिली आहे. त्याचे लक्ष जवळपास एका महिन्यामध्ये तीन लाख रुपये गोळा करण्याचे आहे. वरुणने या अभियानाशी अधिकाधिक लोक जुडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.