आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि शिवसेनेच्या दणक्यानंतर कुशल बद्रिकेला मिळाले थकीत मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना चित्रपट सेना ही मराठी कलाकारांना न्याय मिळवून देणारी एकमेव संघटना असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कलाकारांना वेळेत मानधन न मिळण्याचे अनेक उदाहरणं आहेत. अलीकडच्या काळात चित्रपट-मालिका कलावंतांना शिवसेना चित्रपट सेनेच्या प्रयत्नाने थकीत मानधन मिळाले होते. आता 'फू बाई फू' फेम अभिनेता कुशल बद्रिकेच्या बाबतीतही असंच घडलं.

सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेला 'हुप्पा हुय्या' हा सिनेमा 2010 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता कुशल बद्रिकेची महत्त्वाची भूमिका होती. सिनेमा येऊन गेला तरी त्याचं मानधन देण्यास निर्मात्यांनी टाळाटाळ सुरू केली होती. मात्र शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे कुशलला त्याच्या मेहनतीचे पैसे मिळाले आहेत.

याविषयी कुशलने सांगितले की, ''माझे एकूण 32 हजार रुपये निर्मात्यांकडे अडकले होते. सिनेमा येऊन गेला तरी पैशांचं नाव काढलं जात नाही म्हणून माझा पाठपुरावा सुरू होता. दर दोन दिवसांआड मी निर्मात्यांना फोन करायचो. जवजवळ दीडशे फोन कॉल्स मी त्यांना केले. मात्र ते काही केल्या दाद देत नव्हते. नंतर मात्र मीच पैसे मिळण्याची अपेक्षा सोडून दिली होती. मात्र दहा दिवसांपूर्वी शिवसेना चित्रपट सेनेकडून याबाबत विचारणा झाली. मी त्यांच्याशी सविस्तरपणे बोललो आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे दोनच दिवसांपूर्वी मला 32 हजारांचा चेक मिळाला. कष्टाचे पैसे परत मिळाल्यामुळे आनंद होतोय,'' असे कुशलने सांगितले.