आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारताला कुस्ती या क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर लवकरच मराठीत चित्रपट येत असून रांगडा अभिनेता सिद्धार्थ जाधव यात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जाधव यांनी भारताला कुस्तीत पहिले ब्रांझपदक मिळवून दिले होते. यानंतर या खेळाला खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले. जाधव यांच्या नावाने अनेक पुरस्कारही दिले जातात. मात्र, आजही त्यांच्या कामगिरीबद्दल अनेकांना माहिती नाही. हीच बाब लक्षात घेऊन दिव्य मराठीचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांनी जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहेत. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना साइन करण्याचा शिंदे यांचा मनोदय आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीदेखील चर्चा केली आहे.

खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे शिंदे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. वर्षाच्या शेवटी चित्रीकरण पूर्ण करून तो पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात येईल.